Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोर्शी तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी

मोर्शी तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी

मरावती, 30 मे (हिं.स.) मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील शेतकरी राजेंद्र बाबारावजी नवघरे वय ५५ वर्ष यांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, मोर्शी तालुक्यातील उष्माघाताचा हा पहिला बळी ठरला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यात तापमानाने उच्चांक गाठला असून दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाला शेतातील कामे करणे अत्यंत कठीण झाले आहे. दापोरी येथील शेतकरी राजेंद्र नवघरे हे दिनांक २८ मे रोजी नियमितप्रमाणे शेतातील कामासाठी शेतामध्ये गेले असता अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना तातडीने अमरावती येथील पंजाबराव देशमुख रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दिनांक २९ मे रोजी मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी वर्गामध्ये प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात तापमान ४५ अंशांच्या पुढे जात असताना ग्रामीण भागात आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि उष्माघात प्रतिबंधक उपाय अपुरे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi