Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोसम नदी प्रदूषण प्रकरण : मनपाच्या तीन अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन

मोसम नदी प्रदूषण प्रकरण : मनपाच्या तीन अधिकाऱ्यांचे तातडीने निलंबन

मालेगाव, 28 मे (हिं.स.) : बकरी ईदच्या दिवशी मोसम नदीत रक्तमिश्रित पाणी वाहिल्याच्या प्रकरणी मालेगाव महानगरपालिका प्रशासनाने मोठी कारवाई करत शहर अभियंता, सहाय्यक आयुक्त आणि स्वच्छता निरीक्षक अशा तीन अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित केले आहे.

महानगरपालिका आयुक्तांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.

मोसम नदी प्रदूषित होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यापूर्वी प्रशासनाला दिले होते. मात्र, बकरी ईदच्या दिवशी नदीत रक्तमिश्रित पाणी वाहताना आढळल्याने सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे रामदास बोरसे यांनी या घटनेच्या निषेधार्थ सांडवा पुलावर आंदोलन सुरू केले. रक्तमिश्रित पाण्याचे शंखनाद करून जलपूजन व दुग्धाभिषेक करण्याचा त्यांचा प्रयत्न पोलिसांनी रोखल्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. या आंदोलनाला 'आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती'चे निखिल पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे भरत पाटील, भाजप शहराध्यक्ष देवा पाटील, मच्छिंद्र शिर्के यांच्यासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.

आंदोलनाची दखल घेत अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ, मनपा आयुक्त रवींद्र जाधव आणि सहपोलीस अधीक्षक दर्शन दुग्गड यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

यानंतर अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांनी मनपा शहर अभियंता कैलास बच्छाव, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे आणि प्रभाग अधिकारी श्याम बुरकुल यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मनपा आयुक्त रवींद्र जाधव यांनी तातडीने निलंबनाचे आदेश जारी केले. आदेशाची प्रत आंदोलनकर्त्यांना देण्यात आली.

दरम्यान, मालेगाव शहरातील बेकायदेशीर कत्तलींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कारवाई करण्यात येईल तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात शासनाकडे पुढील कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi