Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या बोगद्याच्या निर्मितीचे कार्य यशस्वी

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या बोगद्याच्या निर्मितीचे कार्य यशस्वी

हाय स्पीड रेल्वे प्रकल्पातल्या वेगवान प्रगतीचे निदर्शक

नवी दिल्ली, 2 जून (हिं.स.) : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प मानल्या जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.

आंबेसरी गावाजवळील एमटी-07 (MT-07) या पर्वतीय बोगद्याचे खोदकाम आणि निर्मिती कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात तीन पर्वतीय बोगद्यांची कामे पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या प्रगतीला वेग मिळाल्याचे दिसून येत आहे.

नवीन पूर्ण झालेला एमटी-07 बोगदा 417 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंद असून, त्यामध्ये बुलेट ट्रेनच्या अप आणि डाऊन मार्गिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगराच्या दोन्ही बाजूंनी नियंत्रित स्फोट आणि खोदकाम तंत्राचा वापर करून हा बोगदा तयार करण्यात आला. या प्रक्रियेत अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान, भू-तांत्रिक उपकरणे आणि सुरक्षिततेच्या सर्व मानकांचे काटेकोर पालन करण्यात आले.

बोगद्याच्या बांधकामादरम्यान संरचनात्मक स्थैर्य, कामगारांची सुरक्षा आणि कामातील अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक देखरेख यंत्रणा वापरण्यात आली. तसेच अग्निशमन व्यवस्था, नियंत्रित प्रवेश प्रणाली आणि सातत्यपूर्ण भू-तांत्रिक निरीक्षण यांसारख्या व्यापक सुरक्षा उपाययोजना राबविण्यात आल्या.

यापूर्वीही दोन बोगद्यांचे काम पूर्ण

याआधी 2 जानेवारी 2026 रोजी पालघर जिल्ह्यातील सफाळे परिसरात एमटी-05 या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या पर्वतीय बोगद्याचे काम पूर्ण झाले होते. हा महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा पहिला यशस्वी पर्वतीय बोगदा ठरला.

त्यानंतर 3 फेब्रुवारी 2026 रोजी एमटी-06 या 454 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण करण्यात आले. हा बोगदा न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) वापरून तयार करण्यात आला होता. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात दोन बोगद्यांची कामे पूर्ण करण्याचा विक्रम प्रकल्पाने नोंदवला होता.

सातपैकी तीन बोगदे पूर्ण

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या सात पर्वतीय बोगद्यांपैकी एमटी-05, एमटी-06 आणि एमटी-07 या तीन बोगद्यांची कामे पूर्ण झाली आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर एकूण आठ पर्वतीय बोगदे असून त्यापैकी सात पालघर जिल्ह्यात तर एक गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात आहे. वलसाडमधील बोगद्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे.

विशेष म्हणजे वापी आणि बोईसर या बुलेट ट्रेन स्थानकांदरम्यान असलेल्या सर्व तीन पर्वतीय बोगद्यांचे खोदकाम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गिका महाराष्ट्रातील बोईसर आणि गुजरातमधील वापी या महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यातून जात असल्याने या विभागाचे विशेष महत्त्व आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात अत्याधुनिक बोगदा खोदकाम, देखरेख आणि बांधकाम तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. या प्रकल्पामुळे भारताची हाय-स्पीड रेल्वे पायाभूत सुविधा उभारण्याची क्षमता अधिक मजबूत होत असून, सुरक्षित, आधुनिक आणि भविष्योन्मुख रेल्वे वाहतूक व्यवस्थेचा पाया भक्कम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi