Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

मुंब्र्यातील तरूणांनी कृतीतून दिला हिंदू -मुस्लीम एकतेचा संदेश

ठाणे, 30 ऑगस्ट (हिं.स.)। हिंदू, मुस्लीम अशी संमिश्र वस्ती असलेल्या मुंब्र्याने नेहमीच सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. आज पहाटे याच पद्धतीने सामाजिक सौहार्दाचे दर्शन घडवून मुंब्रा येथील तरूणांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

गणरायाच्या मूर्तीला घेऊन गणेशोत्सव मंडपाच्या दिशेने निघालेली ट्राॅली तुटल्यानंतर या तरूणांनी क्रेन आणून गणेशमूर्ती दुसरीकडे स्थानापन्न केलीच; शिवाय, सुमारे चार तास परिश्रम घेऊन नवीन ट्राॅली आल्यानंतर गणरायाची मंडपाच्या दिशेने रवाना केले.

मुंब्र्यातील शंकर मंदिर परिसरात तयार करण्यात आलेली सुमारे 20 फूट उंचीची मार्कंडेय सेवा संस्थेची श्री गणेशमूर्ती भिवंडीच्या पद्मानगरच्या दिशेने निघाली होती. मुंब्रा येथील दाभोळकर नाक्यावर गणेशमूर्ती घेऊन येणारी ट्राॅली रात्री 12 वाजेच्या सुमारास आली असता या ट्राॅलीचे चाक तुटले. त्यामुळे गणेशमूर्तीला हानी पोहचण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचवेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आरिफ सय्यद उर्फ पापा, बासीत शेख आणि शाहू या तिघांनी अनेक तरूणांना बोलावून ही ट्राॅली कलंडणार नाही, याची काळजी घेत ट्राॅलीला आधार दिला. क्रेन बोलावून गणेशमूर्ती खाली उतरविली तसेच नवीन ट्राॅली आल्यानंतर गणेशमूर्ती चढवून पहाटे चार वाजेच्या सुमारास भिवंडीच्या दिशेने रवाना केली. विशेष म्हणजे यावेळी मुस्लीम तरूणांनीच श्रीफळ देखील वाढविले.

आरिफ सय्यद उर्फ पापा, बासीत शेख आणि शाहू या तिघांनी गणेशमूर्तीला इजा होऊ नये, यासाठी रात्रभर घेतलेल्या परिश्रमाबद्दल मार्कंडेय सेवा संस्था गणेशोत्सव मंडळाने तिघांचे तसेच मुंब्रा शहराचे आभार मानले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi