Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

नागपूर : साक्षीदाराचे अपहरण, खोटी साक्ष देण्याचा दबाव

न्यायालयात साक्षीदाराकडून पोलिसांवर केले आरोप

नागपूर, 30 जुलै (हिं.स.) : खुनाच्या गंभीर प्रकरणातील मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर दबाव आणून त्याला खोटी साक्ष देण्यासाठी भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे समोर आला आहे.

साक्षीदाराचे अपहरण करून त्याला रात्रभर डांबून ठेवणे, मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या प्रकरणात उमरेड पोलिसांनी तत्पर कारवाई करत एका वकिलासह 4 आरोपींना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राकेश शंकर महाकाळकर (वय २६, रा. इतवारीपेठ, उमरेड), अक्षय वसंत पाटील (वय ३०, रा. रानबोडी, ता. कुही, जि. नागपूर), प्रद्युम्न दिलीप कुरुतकर (वय २६, रा. रानबोडी, ता. कुही, जि. नागपूर) आणि ऍड. रमेश रावलानी (वय ५७, रा. जरीपटका, नागपूर) यांचा समावेश आहे.उमरेड पोलीस ठाण्यात 2022 मध्ये रोशन कारगावकर (रा. कोष्टी मोहल्ला, इतवारीपेठ, उमरेड) आणि बादल लेंडे (रा. उमरेड) यांच्याविरुद्ध कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 28 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास आरोपी राकेश महाकाळकर याने आपल्या दोन साथीदारांसह खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला घराबाहेर बोलावले.त्यानंतर आरोपींनी साक्षीदाराला जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. त्याला रात्रभर एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले. यावेळी त्याच्यावर दबाव टाकण्यात आला, मारहाण करण्यात आली आणि जबरदस्तीने दारू पाजल्याचा आरोप आहे.

त्यानंतर सदर आरोपी 29 जुलै रोजी साक्षीदाराला सत्र न्यायालय, नागपूर येथे घेऊन गेले. तेथे न्यायालयात आरोपींच्या सांगण्याप्रमाणे "मला काही आठवत नाही" अशी खोटी साक्ष देण्यासाठी त्याच्यावर दबाव आणण्यात आला. तसेच तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे साक्षीदाराने पोलिसांना सांगितले.

भीतीच्या वातावरणात असलेल्या साक्षीदाराने न्यायालयात उभे राहून आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार उघड केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उमरेड पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 140 (4), 232 (1), 127 (7), 351 (3) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस तपासात आरोपी राकेश महाकाळकर आणि प्रद्युम्न कुरुतकर यांच्यावर यापूर्वीही उमरेड पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उमरेड पोलीस करत आहेत.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi