Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपूरहून चोरी केलेली शिवाई बस अमरावतीत जप्त

नागपूरहून चोरी केलेली शिवाई बस अमरावतीत जप्त

- आंतरराज्यीय बसचोर राजापेठ पोलिसांच्या जाळ्यात

मरावती, 02 जुलै (हिं.स.) : नागपूरच्या इमामवाडा बस स्थानकातून चोरीला गेलेली सुमारे १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची शिवाई बस अवघ्या काही तासांत शोधून काढत राजापेठ पोलिसांनी आंतरराज्यीय बसचोराला अटक केली आहे.

या कारवाईत बस जप्त करण्यात आली असून आरोपीला पुढील तपासासाठी नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापेठ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल नापोकाँ सारंग आदमणे आणि विजय धुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. इमामवाडा बस स्थानकातून चोरीला गेलेली बस (क्र. एमएच-49-बीएच-8258) नंदा मार्केट परिसरात उभी असल्याचे समोर आले. त्याचबरोबर संशयित आरोपी गद्रे चौक परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हालचाल करून बससह आरोपीला ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपीने आपले नाव विष्णू गणपती नीलावर (वय 23), रा. ढईत नगर, जि. रंगारेड्डी (तेलंगणा) असे सांगितले. त्याने १ जुलै रोजी पहाटे सुमारे १ वाजता बस चोरी केल्याची कबुली दिली आहे.

तपासादरम्यान आरोपीने आणखी धक्कादायक खुलासे केले असून तेलंगणा, हैदराबाद आणि आंध्र प्रदेशात मिळून सुमारे २० बसेस चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. तसेच नांदेड बस डेपोतूनही बस चोरी केल्याचे समोर आले आहे. आरोपीविरुद्ध नांदेड व आंध्र प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये बस चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर आणि इतर महत्त्वाचे सुटे भाग काढून विक्री करत असे आणि उर्वरित बस घटनास्थळीच सोडून देत असे.

या प्रकरणी नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी व जप्त बस पुढील तपासासाठी ताब्यात देण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उमेश मुंडे आणि सपोनि नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीट मार्शल व डीबी पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi