रामनगरच्या बाजीप्रभू देशपांडे चौकात केले हनुमान चालीसा पठण
नागपूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.) : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी ढाचा पाडण्यात आला, त्यावेळी दूरचित्रवाणीवर ते दृश्य पाहून आपल्याला अश्रू अनावर झाल्याचे विधान केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या नागपूर महानगर शाखेने मंगळवारी तीव्र आंदोलन केले.
रामनगर येथील बाजीप्रभू देशपांडे चौकात झालेल्या या आंदोलनादरम्यान सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाला सद्बुद्धी मिळावी, यासाठी हनुमान चालीसाचे सामूहिक पठण करण्यात आले.
भाजपचे नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर महानगर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी काँग्रेसच्या भूमिकेवर जोरदार टीका करत आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा दिल्या.आंदोलनाला संबोधित करताना सचिन करारे म्हणाले की, देशातील दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात सोनिया गांधी यांनी बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेबाबत केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे. त्याचवेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिवाळीची तुलना ईदशी केल्याचा आणि काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी दिवाळीबाबत वादग्रस्त विधान केल्याचा उल्लेख करत करारे यांनी काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित केले.विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी विधाने केली जात आहेत का, याचा विचार जनतेने करावा, असेही ते म्हणाले.
यावेळी करारे यांनी बाबरी ढाचा प्रकरण, बाटला हाऊस चकमक, कलम 370 हटविण्याचा निर्णय, सर्जिकल स्ट्राइक आणि ऑपरेशन सिंदूर यांसारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित घटनांचा संदर्भ दिला. या घटनांबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर टीका करताना देशाचा स्वाभिमान, राष्ट्रीय एकात्मता आणि लष्करी सामर्थ्य यांसारख्या विषयांवर काँग्रेसने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सोनिया गांधी यांना उद्देशून करारे म्हणाले की, भारत आज विकासाच्या दिशेने वाटचाल करत असून देशाचे सामर्थ्य आणि जागतिक प्रतिष्ठा वाढत आहे. त्यामुळे देशाच्या प्रगतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. देशाच्या विकासाचा आणि सामर्थ्यवृद्धीचा अभिमान प्रत्येक नागरिकाने बाळगला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
'देशाच्या स्वाभिमानाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही'
भारतीय जनता युवा मोर्चाने या आंदोलनाच्या माध्यमातून देशातील युवा शक्ती राष्ट्राच्या स्वाभिमानाच्या बाजूने ठामपणे उभी असल्याचा संदेश दिला आहे. देशाची अस्मिता आणि जनभावनांशी संबंधित विषयांवर आक्षेपार्ह भूमिका घेतली गेल्यास युवा मोर्चा त्याला तीव्र विरोध करेल, असा इशाराही सचिन करारे यांनी दिला.या आंदोलनात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री दीपांशु लिंगायत यांच्यासह नागपूर महानगरातील युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

