Tuesday, 15 Dec, 8.08 pm Hindusthan Samachar

मुख्य बातमी
नगर : गदिमांचे स्मारक संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित ठरेल - डॉ. कळमकर

अहमदनगर, 15 डिसेंबर (हिं.स.):- महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी,गीतरामायणकार ग.दि. माडगळूकर यांचे स्मारक महाराष्ट्राचे संचित ठरेल.त्यासाठी गदिमांची जन्मभूमी शेटफळ,मुळ गाव माडगूळ व कर्मभूमी पुणे येथे स्मार कासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांनी केले. गदिमांच्या स्मारकासाठी सरकारला जाग आणण्यासाठी ३६ जिल्हे, ४ राज्ये व ६ देशात एकाचदिवशी गदिमांच्या साहित्यावर आधारित काव्यजागर कार्यक्रम करण्यात आला.नगर येथे कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या काव्य जागर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून कळमकर बोलत होते. जेष्ठ कवी चंद्रकांत पालवे, मसापचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर, गझलकार प्रा. रविंद्र काळे, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे आदि उपस्थित होते.कळमकर पुढे म्हणाले की, प्रतिकुल परिस्थितीशी जुळवून घेण्यातच बरेचसे पुर्वायुष्य खर्ची पडल्याने गदिमांच्या मनात आयुष्याविषयी कटूता वा अढी नव्हती. त्याचे स्वच्छ प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसायचे. गदिमा हे मराठी साहित्य संस्कृतीतले एक झपाटलेले झाड होते. दारिद्रय व अपार कष्ट अशा खडतर वाटचालीतूनही त्यांनी मराठीला काही अभिजात व कलापूर्ण चित्रपट दिले. त्यांच्या या अपूर्व देण्याबद्दल मराठी माणूस त्यांचा कायम कृतज्ञ आहे.

आपल्या रूपाने गदिमांनी साहित्य चित्रपटसृष्टीत एक वैभवशाली पर्वच निर्माण केले. अशा मनस्वी साहित्यिकाचे स्मारक होणे हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल असे ते म्हणाले.ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी सांगितले की, आमच्या तरुण वयात गदिमांच्या गीतरामायणाचे मोठी भुरळ सर्वांना होती. गदिमांचे निधन झाले तेव्हा रोज गितरामायण ऐकणारे एक प्राध्यापक रेडिओ छातीशी लावून रडण्याचे मी पाहिले आहे. गदिमा समाज मनाच्या इतके खोलवर रुजलेले होते. यावेळेस गझलकार प्रा .रवी काळे, जयंत येलूलकर यांचीही भाषणे झाली. बापूराव गुंजाळ व विजय साबळे यांनी गदिमांच्या काही कविता गाऊन दाखवल्या.
हिंदुस्थान समाचार
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi
Top