नांदेड, १ सप्टेंबर (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी प्रारूप मतदार यादी तपासून त्यामध्ये काही त्रुटी, नावाबाबत हरकत किंवा आवश्यक दुरुस्ती असल्यास ३० सप्टेंबर २०२६पूर्वी दावे व हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
प्रारूप मतदार यादी सर्व तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये तसेच संबंधित मतदान केंद्रांवर नागरिकांच्या पाहणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय अनुपस्थित, स्थलांतरित, मयत आणि दुबार मतदारांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत असून, प्राप्त दावे-हरकतींवर सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा २९ ऑक्टोबर २०२६ पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व मतदारांनी प्रारूप यादीत आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील अचूक असल्याची खात्री करावी. मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन यादी तपासता येणार आहे. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), तहसील कार्यालय किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातही यादी पाहता येईल.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणारे नागरिक नवमतदार म्हणून नोंदणीस पात्र ठरणार आहेत. पात्र नागरिकांनी नमुना ६ चा अर्ज घोषणापत्रासह आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावा. नमुना ६ए परदेशस्थित भारतीय मतदारांसाठी, नमुना ७ नावाला हरकत किंवा नाव वगळण्यासाठी, तर नमुना ८ नाव, वय, पत्ता आदी तपशीलातील दुरुस्ती, दिव्यांगत्वाचे चिन्हांकन किंवा मतदाराचे नाव स्थलांतरित करण्यासाठी वापरता येईल.
मतदार यादीतील तपशीलातील विसंगती किंवा अनमॅपिंगबाबत नोटीस मिळालेल्या नागरिकांनी सुनावणीच्या वेळी जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, पारपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, कौटुंबिक नोंदवही आदी कागदपत्रांचा समावेश होतो.
मतदारांनी प्रारूप यादीची काळजीपूर्वक पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
