नांदेड, 04 जून (हिं.स.)।
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या पथकाने नांदेड परिक्षेत्रात गुटखा व अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविली असून १३ लाख ८४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
दरम्यान विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी या बाबतच्या सूचना परिक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांना निर्गमित केलेल्या होत्या त्यावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.
नांदेड परिक्षेत्रात गुटखा विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध 4 गुन्हे नोंदवत, या व्यवसायात गुंतलेल्या एकूण 6 आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.
सदर मोहिमेअंतर्गत, परिक्षेत्रातील नांदेड जिल्ह्यात 1, हिंगोली जिल्ह्यात 1 तर लातूर जिल्ह्यात 2 अशा एकूण 4 कारवाया करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी एकूण 6 आरोपींकडून 13 लाख 84 हजार 721 रुपये किंमतीचा गुटखा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चालू महिन्यात, नांदेड परिक्षेत्रात गुटखा व इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत असून, सदर मोहिमेदरम्यान स्वादिष्ट, सुगंधित तंबाखू, अपमित्रके युक्त चघळण्याची तंबाखू, स्वादिष्ट, सुगंधित सुपारी, गुटखा, पान मसाला, खर्रा, मावा व तत्सम पदार्थांची साठवण, वितरण व वाहतूक याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 123 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.
उपरोक्त पदार्थाच्या संदर्भात, संबंधिताविरुद्ध कलम 123 बी.एन.एस. अन्वये करण्यात आलेल्या कारवाईचा खटला हा सत्र न्यायालयात चालणारा असून त्यास दहा वर्षेपर्यंत कारावासासह द्रव्य दंडाची देखील शिक्षा आहे. पान टपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थाची पानटपऱ्यांवरून होणारी विक्री थांबविण्यासाठी पोलिसांनी पान टपऱ्यांची व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. काल दिवसभरात नांदेड परिक्षेत्रात एकूण (264) पान टपऱ्यांची तपासणी करण्यात आली असून, गुटखा व अंमली पदार्थाच्या संभाव्य साठवणुकीच्या ठिकाणांची व्यापक तपासणी हाती घेण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
