नांदेड, 15 मे (हिं.स.) : नांदेड-अर्धापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर गुलमोहर हॉटेलजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मोटारसायकल चालक राँग साईडने येत असल्याने समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकला धडक बसून हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल धाडवे, मान आणि शेळके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या अपघातात मोटारसायकल क्रमांक एमएच-२६ एएल-२७०३ आणि मालवाहू ट्रक क्रमांक एमएच-२६ एडी-२४०३ यांचा समावेश आहे. अपघातात प्रसाद सोनटक्के (वय २१), वंदना सोनटक्के (वय ४५), ओमकार सोनटक्के (वय ६) आणि शितल सोनटक्के (वय २६, सर्व रा. हसापूर, ता. जि. नांदेड) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर जखमींना तातडीने आधार हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis
