Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक - लोकसंवाद-२०२६ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक - लोकसंवाद-२०२६ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक, 22 सप्टेंबर, (हिं.स.)। सहकार क्षेत्राच्या माध्यमातून नागरिक, शेतकरी, महिला बचतगट तसेच विविध सहकारी संस्थांना आर्थिक व संस्थात्मक बळकटी देण्यासाठी शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनांची माहिती घेऊन पात्र लाभार्थ्यांनी संबंधित सहकारी संस्था अथवा सहकार विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे सहायक निबंधक वैभव मोराडे यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित 'लोकसंवाद-२०२६' उपक्रमांतर्गत दिंडोरी येथे नरहरी सिताराम झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या गणेश मंडळाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी सहकारी संस्थेचे सहायक निबंधक वैभव मोराडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक प्रवीण बावा, उज्वला कोथळे, प्रतीक जाधव, अशोक निकम, कैलास देवकर, गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.

सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्री. मोराडे म्हणाले की, तालुकास्तरीय सहकारी संस्थांची नोंदणी, सहकारी संस्थांच्या पोटनियमांमध्ये दुरुस्ती, सहकारी संस्थांशी संबंधित विविध अर्ज व प्रस्तावांवर कार्यवाही करण्यात येते. तसेच डॉ .पंजाबराव देशमुख योजना राबविण्यात येते. नागरिकांना पारदर्शक, वेळबद्ध आणि सुलभ सेवा देण्यात येतात. सहकारी विभागाशी संबंधित योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थेचे सहायक निबंधक वैभव मोराडे यांनी केले.

गणेशोत्सव हा मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येण्याचा उत्सव असल्याने या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न 'लोकसंवाद-२०२६' उपक्रमातून करण्यात येत आहे. नागरिकांनी विविध शासकीय योजनांची माहिती घेऊन पात्रतेनुसार त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सहकारी संस्थेचे सहायक निबंधक श्री. मोराडे यांनी सहकार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांना यावेळी दिली. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, पात्रता व उपलब्ध सुविधांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्यावतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'लोकसंवाद-२०२६' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी शासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत शासनाच्या विविध योजना, उपक्रम व लोककल्याणकारी निर्णयांची माहिती नागरिकांना थेट देण्यात येत असल्याची माहिती उपसंपादक श्री. बावा यांनी दिली.

'लोकसंवाद-२०२६' उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती देतानाच गणेशोत्सवाशी संबंधित वारसा, परंपरा आणि कौटुंबिक आठवणी पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशाने 'बाप्पा डॉट ऑर्ग' हा अभिनव डिजिटल उपक्रमही नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या उपक्रमाला गणेशोत्सव मंडळे व नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi