Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

नाशिक - रिंगरोडबाधित शेतकऱ्यांचा मुंबईत एल्गार

एमआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

नाशिक, 30 ऑगस्ट (हिं.स.) - प्रस्तावित नाशिक रिंगरोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गौळाणे व आंबेबहुला परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आता मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता रिंगरोडबाबत अंतिम निवाडा जाहीर केल्याचा आरोप करीत प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली (दि. ३१) मुंबईतील एमएसआयडीसी कार्यालय, बक्तावर बिल्डिंग, नरिमन पॉईंट येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

रिंगरोड प्रकल्पासाठी गौळाणे व आंबेबहुला परिसरातील शेतजमिनी बाधित होत आहेत. या पार्श्वभूमीवर एमएसआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करावी, अशी मागणी बाधित शेतकरी अनेक दिवसांपासून करीत आहेत. मात्र, वारंवार मागणी करूनही बैठकीसाठी वेळ दिला जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

या मागण्यांसाठी बाधित शेतकऱ्यांनी दि. २८ ऑगस्ट रोजी नाशिक ते मुंबई पायी मोर्चा काढला होता. मात्र, हा मोर्चा एमआयडीसी पोलिसांनी अडविला. त्यानंतरही शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली असून, आता (दि. ३१) मुंबईत एमएसआयडीसी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार काटेकोरपणे कार्यवाही करावी, उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे, रिंगरोडशी संबंधित सर्व दस्तऐवज बाधित शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत तसेच प्रकल्पासंदर्भातील तांत्रिक बाबींवर एमएसआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी व शेतकऱ्यांची बैठक घ्यावी, अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. या मागण्यांवर चर्चा न झाल्यास एमएसआयडीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दत्तू थापेकर, सुरेश देशमुख, राजाराम देशमुख, सुनील पवार, रमेश गडकरी, योगेश गडकरी आणि सागर चुंभळे यांच्यासह बाधित शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. रिंगरोडच्या तांत्रिक बाबी, भूसंपादन प्रक्रिया व उपलब्ध दस्तऐवजांबाबत समाधानकारक चर्चा होईपर्यंत प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याची भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुंबईतील आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi