Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक : तब्बल ५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने साधला विश्वविक्रम

नाशिक : तब्बल ५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने साधला विश्वविक्रम

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी

नाशिक, २५ ऑक्टोबर (हिं.स.) : गोदावरीच्या पवित्र तीरावर ५१७ जणांनी एकाच वेळी शंखनाद करून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. यापूर्वी अमेरिकेतील ३०३ शंखवादकांच्या नावे असलेला विक्रम मोडीत काढत नाशिकने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग यांनी या विक्रमाची घोषणा करताच गोदाकाठ 'भारत माता की जय'च्या जयघोषाने दुमदुमून गेला. भक्ती, श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीचा गौरव अधोरेखित करणारा हा सोहळा आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या आध्यात्मिक पर्वाची मंगल नांदी ठरला.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आणि अनंत विजय शंखनाद पथक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर गोदाकाठावरील यशवंत महाराज पटांगण येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. एकाच वेळी शेकडो जणांनी केलेल्या शंखनादामुळे परिसरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, नियोजन विभागाचे उपायुक्त योगेंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रतिनिधी ऋषिकेश नाग, समन्वयक मिलिंद बेर्लेकर, अनंत विजय शंखनाद पथकाच्या वृषाली घोलप आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्यासह साधू-महंत, शंखवादक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोन निरीक्षकांकडून पडताळणी

एकाच वेळी सर्वाधिक व्यक्तींनी शंखनाद करण्याचा यापूर्वीचा विक्रम ३०३ व्यक्तींचा होता. हा विक्रम मोडण्यासाठी निर्धारित निकषांनुसार त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकाच वेळी शंखनाद करणे आवश्यक होते. या उपक्रमासाठी ५०० हून अधिक जणांनी नोंदणी केली होती. सहभागींच्या नोंदी, प्रत्यक्ष सहभाग आणि निर्धारित नियमांनुसार केलेल्या कामगिरीची दोन निरीक्षकांकडून पडताळणी करण्यात आली.

शंखनाद करणे ही केवळ धार्मिक कृती नसून त्यासाठी श्वसनावर नियंत्रण, नियमित सराव, प्राणायाम आणि शारीरिक क्षमता आवश्यक असते. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागींचा समन्वय साधून एकाच वेळी शंखनाद करणे हे आव्हानात्मक होते. सहभागींची तयारी, शिस्त आणि उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा उपक्रम यशस्वी झाल्याचे आयोजकांनी नमूद केले.

भारतीय संस्कृतीचा जागतिक गौरव

विश्वविक्रमाची घोषणा झाल्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन केले. हा उपक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशाच्या लौकिकात भर घालणारा आहे. अशा उपक्रमांमधून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि सामूहिक सहभागाची ताकद जगासमोर येते, असे त्यांनी सांगितले.

भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत शंखनादाला विशेष महत्त्व आहे. मंगलकार्य, धार्मिक विधी आणि आध्यात्मिक उपासनेमध्ये शंखध्वनीला पवित्र मानले जाते. या परंपरेला विश्वविक्रमाची जोड मिळाल्याने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीला नवी प्रतिष्ठा प्राप्त झाली.

कुंभमेळा प्रत्येक नाशिककराचा सोहळा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री महाजन यांनी नागरिकांना तयारीत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी किंवा पोलिसांचा कार्यक्रम नसून प्रत्येक नाशिककराचा सोहळा आहे. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे ज्या आपुलकीने स्वागत केले जाते, त्याच भावनेने कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा सन्मान केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा आहे.

या पार्श्वभूमीवर रस्ते, घाट, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, वाहतूक, निवास, भोजन आणि भाविकांना मार्गदर्शन यांसारख्या सुविधांचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. प्रशासनाकडून पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम सुरू असून नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, स्वयंसेवक आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना योग्य माहिती मिळावी, त्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि नाशिकमधील वास्तव्य सुखकर व्हावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. नाशिकची स्वच्छता, सुंदरता आणि नागरिकांचे प्रेमळ आदरातिथ्य भाविकांच्या स्मरणात राहावे, हीच या सोहळ्याच्या यशाची खरी कसोटी असेल, असेही महाजन यांनी नमूद केले.

रामकुंडावर :३१ ऑक्टोबरला ध्वजारोहण

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील रामकुंडावर दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. त्र्यंबकेश्वर येथेही याच वेळी ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

यासंदर्भात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, शंखनादाच्या विश्वविक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. हा विक्रम केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशाच्या लौकिकात भर घालणारा आहे असे महाजन यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi