
मुंबई , 25 ऑक्टोबर (हिं.स.)। दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोने आपल्या लोकप्रिय पल्सर एनएस२०० या मोटारसायकलला अनेक नवीन फीचर्ससह अपडेट केले आहे. या नव्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडी (ईटीबी) तंत्रज्ञान, रायडिंग मोड्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि नवीन टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल यांसारखी आधुनिक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
याशिवाय, मोटारसायकलच्या इंजिनच्या पॉवरमध्ये वाढ करण्यात आली असून, पुढील सस्पेन्शनमध्येही बदल करण्यात आले आहेत. अपडेटेड बजाज पल्सर एनएस२००ची एक्स-शोरूम किंमत १ लाख ६० हजार ३७४ रुपये आहे.
या मोटारसायकलमध्ये पूर्वीच्या एलसीडी डिस्प्लेऐवजी आता ५ इंचांचा टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आला आहे. यामध्ये गुगल मॅप्स मिररिंगची सुविधा असल्याने रायडरला प्रवासादरम्यान नेव्हिगेशनचा वापर करणे अधिक सोयीचे होणार आहे. यासोबतच स्पोर्ट्स शिफ्टर, अॅडजस्टेबल लीव्हर्स आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट यांसारखी फीचर्सही देण्यात आली आहेत.
इंजिनच्या बाबतीत पल्सर एनएस२००मध्ये १९९.५ सीसी क्षमतेचे सिंगल सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन कायम ठेवण्यात आले आहे. मात्र, आता या इंजिनची पॉवर १ hpने वाढवण्यात आली आहे. हे इंजिन २५.५ hpची पॉवर आणि १८.७ एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिनसोबत ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही मोटारसायकल एबनी ब्लॅक, रेसिंग रेड, पर्ल मेटॅलिक व्हाइट आणि नव्या नार्डो ग्रे अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे.
नवीन मॉडेलमधील महत्त्वाचा बदल म्हणजे इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडी तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळे रायडिंग मोड्सची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच, ट्रॅक्शन कंट्रोलमुळे चाकांची पकड राखण्यास मदत होते. यामुळे मोटारसायकल चालवताना रायडरला अधिक नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे.
मोटारसायकलच्या पुढील सस्पेन्शनमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. आधीचे ३३ मिमी फोर्क्स बदलून आता ३७ मिमी अपसाइड-डाउन फोर्क्स देण्यात आले आहेत. मागील बाजूस १३०/७०-आर१७ रेडियल टायर देण्यात आला आहे. मोटारसायकलमध्ये हॅझर्ड स्विच आणि पॅनिक ब्रेक अलर्टसारखी सुरक्षा वैशिष्ट्येही समाविष्ट करण्यात आली आहेत. अचानक जोरात ब्रेक लावल्यास पॅनिक ब्रेक अलर्टद्वारे मागील वाहनचालकांना सतर्क करण्यास मदत होते. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, वाढीव पॉवर आणि सुधारित सुरक्षा वैशिष्ट्यांसह बजाज पल्सर एनएस२०० नव्या स्वरूपात ग्राहकांसमोर आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

