काठमांडू, 01 सप्टेंबर (हिं.स.)।नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराला अनेक दिवस उलटले आहेत, मात्र या महापुराने केलेल्या विध्वंसाचे भयावह चित्र अद्याप कायम आहे. सर्वत्र विखुरलेल्या ढिगाऱ्यांमध्ये जीवंत व्यक्तींचा शोध घेण्याचे अभियान युद्धपातळीवर सुरू आहे.
सुमारे ४ हजार लोक अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत सुमारे ९३९ जणांचे मृतदेह सापडले आहेत.
याचदरम्यान, मंगळवारी नुवाकोट जिल्ह्यात बचावकार्यादरम्यान भोटेकोशी पूरग्रस्त भागांतर्गत येणाऱ्या बिदूर नगरपालिका-१० (वेत्रावती) येथे एका घराच्या ढिगाऱ्यातून तब्बल २४ मृतदेह बाहेर काढण्यात आले. नुवाकोटचे पोलीस अधीक्षक बिपिन रेग्मी यांनी सांगितले की, सापडलेल्या मृतदेहांमध्ये १३ महिला, ११ पुरुष आणि एका मुलाचा समावेश आहे. सध्या या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. ते शवविच्छेदनासाठी काठमांडू येथील त्रिभुवन विद्यापीठाच्या शिक्षण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
त्रिशूली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांनी योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे सुमारे ९०० विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. पुराचा इशारा मिळताच मुख्याध्यापक दवाडी यांनी तातडीने शाळा रिकामी केली आणि शाळेत उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या सुरक्षित डोंगरावर हलवले. त्यानंतर काही वेळातच पाणी, चिखल आणि दगडांचा प्रचंड प्रवाह आला आणि त्याने शाळेची संपूर्ण इमारत वाहून नेली.या दुर्घटनेच्या वेळी शाळेतील १,६४३ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९०० विद्यार्थी कॅम्पसमध्ये उपस्थित होते. दुर्दैवाने, शाळेतील दोन कर्मचारी वेळेत बाहेर पडू शकले नाहीत आणि ते अद्याप बेपत्ता आहेत.
आपत्तीला अनेक दिवस उलटले असले तरी बेपत्ता व्यक्तींची संख्या अजूनही हजारोंमध्ये आहे. एकूण सुमारे ४ हजार लोक अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. रसुवा जिल्ह्यातील उत्तरगया गावातच सुमारे ३५० विद्यार्थ्यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
त्रिशूली-३ए जलविद्युत प्रकल्पात काम करणारे ४० ते ४२ अभियंते अडकले आहेत. आपत्तीच्या वेळी हे सर्वजण कामावर तैनात होते. दुर्घटनेच्या सहाव्या दिवशीही या ठिकाणी बचावकार्य सुरू करता आलेले नाही.त्रिशूली-३बी जलविद्युत प्रकल्पातील परिस्थिती आणखी गंभीर आहे. या प्रकल्पात काम करणारे अभियंते, अधिकारी आणि कामगार अशा एकूण ११८ जणांचा या ठिकाणी अडकलेल्यांमध्ये समावेश आहे. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधता येत नाही.
दरम्यान, पूरग्रस्त भागांसमोर आता आणखी एक मोठे संकट उभे राहिले आहे. दुर्घटनेनंतर सात दिवसांनी सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली आहे. ढिगाऱ्यांमध्ये आणि चिखलात दबलेल्या मृतदेहांचे विघटन सुरू झाल्याने प्रभावित भागांमध्ये साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. बचाव पथकांसमोर आता ढिगाऱ्यांमधून मृतदेह बाहेर काढण्याबरोबरच स्वच्छता व्यवस्था राखणे आणि आजारांचा प्रसार रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

