Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
निवडलेला लोहगड...

निवडलेला लोहगड...

ड म्हंटला की आठवते ती माती, दगड धोंडे त्यावर पसरलेली वृक्षवल्ली सुंदर, फुला फळाने बहरलेली तर काही विषारी सुद्धा. त्याच आश्रयाला रहाणारे पशू पक्षी जणू निसर्गाचा समतोल राखत त्या गडाची शोभा वाढवतात.

प्रत्येक माणूस हा सुद्धा एक गडच नाही का...? ह्या गडाचे मालक माता पिता तर त्यांनी केलेले सुसंस्कार म्हणजे गंधाळलेली बहरलेली वृक्षवल्ली तर समाजाकडून कळत नकळत आलेले संस्कार म्हणजे काटेरी रोपटी. ह्या गडाचे भक्कम बुरुज म्हणजे शैक्षणिक पात्रता. गडाचे बुलंद महाद्वार म्हणजे सुसंस्कारित मन. हे मन जेव्हा चंचल असते तेव्हा कोणताही शत्रू सहज चाल करून येतो. पण तेच मन स्थिर असेल तर अश्या शत्रूंच्या तोफगोळ्यांनी ही मनाचे द्वार तसूभर कोलमडत नाही.

पण प्रश्न एवढाच आहे की, गड जिंकला जातो तो बाहेरून की आतून? दगड धोंड्यांच्या गडाचे शत्रू गडा बाहेर असतात. क्वचित घरभेदी एखाद दुसरा असतो तो ह्या शत्रूंना मिळतो तेव्हा गडाचा भक्कम बुरूज कोसळतो. पण मनाच्या महाद्वारावर विवेकाचा पहारा कमी झाला की, स्वार्थ, अहंकार, मोह, मत्सर आणि सूड यांसारखे अदृश्य शत्रू आत प्रवेश करतात. सुरुवातीला ते विचारांवर ताबा मिळवतात, मग निर्णयांवर आणि शेवटी संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर. कुणाची ही मानसिकता एका दिवसात बदलत नाही. ती छोट्या-छोट्या तडजोडींनी ढळत जाते. चुकीला योग्य ठरवण्याची सवय, स्वतःच्या इच्छेलाच अंतिम सत्य मानण्याचा हट्ट, संवादाऐवजी संघर्ष निवडणे आणि संयमाऐवजी उतावळेपणा स्वीकारणे या सगळ्यांतून मनाचा गड कमकुवत होत जातो. देहरुपी गडाला शिक्षण 'पदवी' देते, पण 'विवेक' देईलच असे नाही. पैसा सुख सोयींची 'साधने' देतो, पण 'समाधान' विकत घेऊ शकत नाही. आधुनिक जीवनशैली 'सुविधा' देते, पण 'संस्कार आणि संवेदनशीलता' यांची जागा घेऊ शकत नाही. म्हणून मनाचा गड मजबूत ठेवण्यासाठी सतत आत्मपरीक्षण, संवाद आणि मूल्यांची जोपासना आवश्यक असते.

म्हणून कोणत्याही घटनेला गड कारणीभूत नसतो. प्रश्न असतो निवडलेल्या विचारांचा म्हणजेच पहारेकऱ्यांचा. दरी गडाबाहेर असते त्याचप्रमाणे माणूस आधी मनाच्या दरीत कोसळतो. त्यानंतरच त्याचे परिणाम जगाला दिसतात. प्रत्येक गाजणाऱ्या गुन्ह्यानंतर आपण एकच प्रश्न विचारतो चूक नेमकी कुठे झाली? संस्कार कमी पडले, मानसिकता बदलली की जीवनशैली भरकटली? संस्कार मूल्ये शिकवली जातात, पण ती आयुष्यभर जपली जातात का ? ह्याकडे कुटुंबाचे व समाजाचे दुर्लक्ष होते. राग, अहंकार, स्वार्थ, सूड किंवा भावनिक अस्थिरता यांचा परिणाम निर्णयांवर होऊन मानसिकता ढळलेली आढळून येते. जीवनशैली बद्दल काय बोलावे ? पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव, आर्थिक स्पर्धेतील, रस्सीखेच, धावपळ, संवादाचा अभाव, डोईजड झालेले सोशल मीडिया, अवास्तव अपेक्षा आणि नात्यांतील प्रामाणिकपणा कमी होणे यामुळे तणाव वाढू लागला आहे ह्या मुळाकडे कुणाचे लक्षच नाही.

संस्कार, मानसिक आरोग्य, संवाद, वैयक्तिक जबाबदारी आणि समाजाचे वातावरण हे सर्व घटक एकत्र येऊन माणसाचे निर्णय घडवतात. म्हणून प्रत्येक दोष शोधताना मूल्ये, संवेदनशीलता आणि संवाद यांना बळकटी देणे अधिक महत्त्वाचे आहे. निवडलेला लोहगड दोषी नव्हता, दोषी होती मनाची ढासळलेली तटबंदी आणि विवेक हरवलेले पहारेकरी..

मित्र शत्रूंची झाली गल्लत,

संस्कारांची तटबंदी खचली..

आयुष्यभराची सुखस्वप्ने,

स्वार्थगडाने गिळंकृत केली.

विठ्ठल बाबुराव घाडी

(लेखक, कवी)

९१६ ७७ ५५ २०३

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi