Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नॉर्वे चेस २०२६: तिसऱ्या फेरीत प्रज्ञानानंदची मॅग्नस कार्लसनवर मात

नॉर्वे चेस २०२६: तिसऱ्या फेरीत प्रज्ञानानंदची मॅग्नस कार्लसनवर मात

स्लो, २८ मे (हिं.स.)भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने बुधवारी नॉर्वे चेस २०२६ च्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करत धक्कादायक निकालाची नोंज केली.

प्रज्ञानानंदने उत्कृष्ट रणनीतिक खेळाचे प्रदर्शन करत ओस्लोमधील हा क्लासिकल सामना जिंकला. सामन्याच्या बहुतांश वेळेत प्रज्ञानानंद मजबूत स्थितीत असल्याचे दिसत होते. वेळेच्या दबावामुळे काही काळासाठी सामना कार्लसेनच्या बाजूने झुकत असल्याचे दिसत असले तरी, त्यानंतर लगेचच या नॉर्वेजियन स्टार बुद्धिबळपटूने एक मोठी चूक केली आणि त्याला पराभव स्वीकारावा लागला.

विश्वविजेता डी. गुकेश आणि स्पर्धेत आघाडीवर असलेला अलीरेझा फिरौजा यांच्यातील क्लासिकल सामना अत्यंत चुरशीचा झाला आणि अखेरीस बरोबरीत संपला. त्यानंतरच्या आर्मागेडन सामन्यात, फिरौजाने विजय मिळवून अतिरिक्त गुण मिळवले आणि गुणतालिकेतील आपली आघाडी कायम राखली. व्हिन्सेंट केमर आणि वेस्ली सो यांच्यातील क्लासिकल सामनाही बरोबरीत सुटला. वेस्ली सो ने नंतर आर्मागेडन सामना जिंकला. तिसऱ्या फेरीनंतर, अलीरेझा फिरौजा गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे.

नॉर्वे बुद्धिबळ महिला स्पर्धेतील सर्व क्लासिकल सामने बरोबरीत सुटल्याने आर्मागेडन सामने खेळवले गेले. महिला विश्वविजेती जू वेनजुन आणि झू जिनर यांच्यात एक चुरशीची लढत पाहायला मिळाली. एका क्षणी झू जिनर मजबूत स्थितीत होती, पण तिला त्याचे विजयात रूपांतर करता आले नाही. झू जिनरने नंतर आर्मागेडन सामना जिंकून अतिरिक्त गुण मिळवले. मुझीचुक आणि भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी यांच्यातील क्लासिकल सामना बरोबरीत सुटला. मुझीचुकने नंतर आर्मागेडन सामना जिंकला.

स्पर्धेत आघाडीवर असलेल्या बिबिसारा असौबायेवा आणि भारताच्या दिव्या देशमुख यांच्यातील क्लासिकल सामनाही अनिर्णित राहिला. त्यानंतर दिव्या देशमुखने शानदार कामगिरी करत आर्मागेडन सामना जिंकला. तिसऱ्या फेरीनंतरही महिलांच्या गटात बिबिसारा असौबायेवा आघाडीवर आहे. पण दिव्या देशमुख आणि झू जिनर यांनी हे अंतर कमी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi