Dailyhunt
पालकमंत्री नसल्याने रायगडच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही : आदिती तटकरे

पालकमंत्री नसल्याने रायगडच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही : आदिती तटकरे

रायगड, 01 मे (हिं.स.)। जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबवले जात आहेत. त्यातून जिल्ह्यातील विविध घटकांचा विकास केला जात आहे.

पालकमंत्री नसल्याने रायगड जिल्ह्याच्या विकासावर कोणताही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट मत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी राज्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन केले.

उद्यमशील, पुरोगामी, व्यावहारिक आणि कठोर परिश्रम करणारे नागरिक ही महाराष्ट्राची खरी ताकद आहे. शेतकरी, मजूर, औद्योगिक कामगार, बांधकाम क्षेत्रातील कामगार तसेच विविध सेवा क्षेत्रातील कष्टकरी बांधवांच्या मेहनतीमुळेच राज्याच्या विकासाची गती कायम असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीत कामगारांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

समारंभाला जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचे गायन करण्यात आले. ध्वजवंदनानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच राष्ट्रगीत, राज्यगीत आणि ध्वजगीत सादर करण्यात आले. देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता. पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, वाहतूक शाखा, गृहरक्षक दल, गुन्हे शाखेचे श्वान पथक, डायल-११२ वाहन, दंगल नियंत्रण वाहन, जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दल तसेच डायल-१०८ वैद्यकीय सेवेच्या वाहनांनी संचलनात सहभाग घेतला.

आपल्या भाषणात आदिती तटकरे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महामानवांच्या कार्याचा गौरव केला.

राज्य व केंद्र शासनाच्या विविध विकास प्रकल्पांचा उल्लेख करताना त्यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, 'तिसरी मुंबई' अंतर्गत रायगड-पेण ग्रोथ सेंटर यांसारख्या प्रकल्पांमुळे रायगडसह राज्याच्या आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचे सांगितले.

महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देताना त्यांनी 'आदिशक्ती अभियान', 'बेटी बचाओ बेटी पढाओ', स्मार्ट अंगणवाडी योजना, हिरकणी कक्ष, वन स्टॉप सेंटर, बालविवाह प्रतिबंध मोहीम यांचा विशेष उल्लेख केला. रायगड जिल्ह्यात ३ हजार ४२६ अंगणवाड्या कार्यरत असून सुमारे १ हजार २६६ स्मार्ट किट अंगणवाड्यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.

स्वच्छ भारत मिशन, मनरेगा, कृषी विकास योजना आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. "आजचा महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नसून विकासाचा संकल्प दिवस आहे," असे सांगत लोकप्रतिनिधी, अधिकारी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट आणि नागरिकांनी एकत्रितपणे सक्षम व समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या शेवटी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पोलीस विभाग, महिला व बाल कल्याण विभाग तसेच विविध शाळांतील शिक्षकांना उल्लेखनीय कार्याबद्दल प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi