Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंतप्रधान मोदी शुक्रवारी सुरत आणि दमणच्या दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी शुक्रवारी सुरत आणि दमणच्या दौऱ्यावर

वी दिल्ली , 04 जून (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुजरातमधील सूरत आणि केंद्रशासित प्रदेश दमन यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सूरत येथे सुमारे १८,८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत.

त्यानंतर दमन येथेही सुमारे २,९७० कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात येणार आहे.

पंतप्रधान शुक्रवारी दुपारी सुमारे २.३० वाजता सूरत जिल्ह्यातील हजीरा येथे पोहोचतील. तेथे सुरू असलेल्या औद्योगिक कामकाजांचा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतील. त्यानंतर सायंकाळी ४.१५ वाजता सूरतमधील जाहीर सभेला संबोधित करत १८,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे राष्ट्राला समर्पण करतील.

पंतप्रधान वडोदरा-मुंबई आठ पदरी नियंत्रित प्रवेश असलेल्या द्रुतगती महामार्गाच्या (एक्सप्रेसवे) पॅकेज क्रमांक ६ आणि ७ चे लोकार्पण करतील. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्र यांच्यातील जलद वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि आर्थिक संपर्क अधिक मजबूत होणार आहे.याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ (एनएच-५६) वरील महत्त्वाच्या मार्गांचे चौपदरीकरण करण्याच्या प्रकल्पाची पायाभरणीही ते करतील. या प्रकल्पामुळे आदिवासी भागांतील रस्ते संपर्क सुधारेल आणि 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'पर्यंतचा प्रवास अधिक सुलभ होईल.

सूरतमध्ये २०० खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. या रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा, २४ तास आपत्कालीन सेवा आणि ट्रॉमा केअर उपलब्ध असेल. तसेच वीज वहन (ट्रान्समिशन) जाळ्याचा विस्तार, वलसाडमधील सुधारित वीज वितरण योजना, दहेज पीसीपीआयआर (पेट्रोलियम, रसायन व पेट्रोकेमिकल गुंतवणूक क्षेत्र) आणि जंबूसर बल्क ड्रग पार्क यांसारख्या महत्त्वाच्या औद्योगिक व सार्वजनिक उपयुक्तता प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजनही होणार आहे.

सूरतमधील कार्यक्रमानंतर पंतप्रधान दमनला रवाना होतील. सायंकाळी ६.१५ वाजता ते 'नमो' विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करतील. त्यानंतर लगेचच 'नमो' रुग्णालय राष्ट्राला समर्पित केले जाईल.दमनमध्ये एकूण २,९७० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण होणार असून त्यामध्ये सुमारे १,३४० कोटी रुपयांच्या पूर्ण झालेल्या प्रकल्पांचा समावेश आहे. सायंकाळी ७.१५ वाजता पंतप्रधान १,६३० कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. यामध्ये आयकॉनिक ब्रिज, दमन कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यांचा समावेश आहे.

पंतप्रधान लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील ८८५ कोटी रुपयांच्या चार महत्त्वाच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी करणार आहेत. कल्पेनी आणि कदमत बेटांवर उभारल्या जाणाऱ्या बहुउद्देशीय जेटींमुळे मोठ्या क्रूझ जहाजांना आणि प्रवासी नौकांना धक्का लावणे अधिक सुलभ होईल.या प्रकल्पांमुळे पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. हे सर्व प्रकल्प रस्ते, आरोग्य, हवाई संपर्क, वीज, औद्योगिक विकास आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः आदिवासी भागांचा विकास, बंदर पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवांवर विशेष भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही ठिकाणी जाहीर सभांनाही संबोधित करणार असून, हा दौरा गुजरात तसेच दादरा आणि नगर हवेली व दमण-दीव यांच्या विकासाला नवी गती देणारा मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi