Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

परभणी महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी जन्म प्रमाणपत्र सेवा पुन्हा सुरू

रभणी, 29 मे (हिं.स.) : परभणी महानगरपालिकेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी जन्म प्रमाणपत्र सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती महापौर सय्यद एकबाल यांनी शुक्रवारी दिली. दुपारी झालेल्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.

महापौरांनी सांगितले की, परभणी तहसीलदार संदीप राजापुरे यांच्याशी चर्चा तसेच नवीन शासन निर्णयाच्या आधारे ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मागील काही काळापासून सेवा बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नागरिक, विविध संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी होत होती.

नागरिकांच्या मागणीची दखल घेत ही सेवा बी. रघुनाथ सभागृह येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी तीन संगणक व सात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहितीही महापौरांनी दिली.

महापौरांच्या दालनात झालेल्या बैठकीस आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत, जन्म-मृत्यू विभागाचे संदीप पवार, स्वच्छता विभागाचे लक्ष्मण जोगदंड, अग्निशमन विभाग प्रमुख दीपक कानोडे, जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव आदी उपस्थित होते.

दरम्यान, विवाह नोंदणी प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली असून नागरिकांनी घरबसल्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर सय्यद एकबाल आणि आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी केले.

नवीन शववाहिनीचे लोकार्पण

याच कार्यक्रमात शहरातील नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने नवीन शववाहिनीचे लोकार्पण करण्यात आले. अनेक वर्षांपासून शववाहिनीची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना अडचणी येत होत्या.

महापौरांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून आता ही शववाहिनी अग्निशमन विभागामार्फत कार्यान्वित राहणार आहे. नागरिकांनी गरज असल्यास 101 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही शववाहिनी शहरातील स्मशानभूमी अथवा कब्रस्तानासाठी उपलब्ध राहणार असून सेवेसाठी संबंधितांना केवळ इंधन खर्च भरावा लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi