Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
परभणी-पुणे मार्गावर ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक, मानवतचे ४ तरुण जागीच ठार

परभणी-पुणे मार्गावर ट्रॅव्हल्सची दुचाकीला भीषण धडक, मानवतचे ४ तरुण जागीच ठार

परभणी, 30 मे (हिं.स.)।

रभणीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सने समोरील दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील चार जण जागीच ठार झाले. हा थरारक अपघात मानवत येथील राहुल जिनिंग समोर घडला.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, मृतांपैकी एकाची ओळख पटवणे सुरुवातीला अत्यंत कठीण झाले होते.

अपघातातील सर्व मृत हे मानवत येथील रहिवासी असून यात शुभम आप्पाराव दहे (वय ३० वर्षे), विष्णू गोरे (वय २८ वर्षे), प्रल्हाद अशोकराव कुटे (वय २९ वर्षे),नवनाथ शामराव जाधव (वय ३८ वर्षे) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनएल ०१ बी १३७४ क्रमांकाची ट्रॅव्हल्स परभणीहून पुण्याकडे जात होती. दरम्यान, राहुल जिनिंग समोर समोरून येणाऱ्या एमएच २२ बीबी ४७२४ क्रमांकाच्या दुचाकीला ट्रॅव्हल्सची समोरासमोर जोरदार धडक बसली.

अपघाताचे वृत्त समजताच मानवतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, पोलीस उपनिरीक्षक किशन पतंगे, प्रमोद देवकते आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अपघातातील जखमी व मृतांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करत वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.

अपघातानंतर पोलिसांनी चारही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाच्या आवारात मृतांच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. एकाच गावातील चार जणांचा अशा अपघातात मृत्यू झाल्याने मानवत शहरासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi