Dailyhunt

परभणीत 3 ते 13 मे दरम्यान आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्ग : 200 शिक्षक व आचार्य सहभागी होणार

परभणी, 30 एप्रिल (हिं.स.)।

विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान संचलित विद्याभारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्था यांच्या वतीने 3 ते 13 मे या कालावधीत दहा दिवसीय आचार्य प्रांत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा प्रशिक्षण वर्ग दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात येत असून, यावर्षी विद्याभारती परभणी शाखा यांच्या वतीने ब्राह्मणगांव परिसरातील राजे संभाजी गुरुकुल येथे हा उपक्रम पार पडणार आहे. या प्रशिक्षण वर्गात शिशु वाटिका तसेच पूर्व-प्राथमिक स्तरावर कार्यरत सुमारे 200 शिक्षक व आचार्य सहभागी होणार असून, त्यांना विविध शैक्षणिक व वैचारिक विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान वैदिक गणित, कार्यकर्ता प्रशिक्षण तसेच अध्यापक प्रशिक्षण यांसारख्या विविध सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्यामुळे शिक्षकांच्या कौशल्यविकासास चालना मिळणार आहे.

या पार्श्वभूमीवर आयोजनाच्या तयारीसाठी राजे संभाजी गुरुकुल येथे बैठक पार पडली. या बैठकीत शैलेश जोशी व दिनेश देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच विभाग अध्यक्ष देवदत्त देशपांडे, विभाग मंत्री प्रताप देशपांडे, संस्कृती ज्ञान परीक्षा प्रांत सहसंयोजक शिवाजी आरळकर, अभय हट्टेकर, जिल्हा अध्यक्ष सुभाष चलवदे, जिल्हा मंत्री शिरीष संघई, जिल्हा सहमंत्री संतोष चिद्रवार, चंद्रशेखर कुलकर्णी, वनमाला कुलकर्णी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून शिक्षकांच्या अध्यापन पद्धती अधिक प्रभावी करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi