Dailyhunt
पराभवानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा राजीनामा

पराभवानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचा राजीनामा

चेन्नई , 05 मे (हिं.स.)। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर द्रमुक अध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे राजीनामापत्र राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे.

२३ एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अभिनेते विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके पक्षाने सत्ताधारी द्रमुकला मोठा धक्का देत पराभूत केले. या पराभवानंतर स्टालिन यांनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला असून, राज्यात नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर एम. के. स्टालिन यांनी राज्यातील जनतेचे मनापासून आभार मानले आहेत. सत्ता गमावूनही त्यांनी निवडणुकीचे निकाल स्वीकारत द्रमुक आघाडीला पाठिंबा देणाऱ्या सर्व मतदारांचे आभार व्यक्त केले. त्यांनी स्पष्ट केले की, पक्ष पराभूत झाला असला तरी जनतेने दिलेला प्रत्येक मत हा त्यांच्या विश्वासाचे मौल्यवान प्रतीक आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत स्टालिन यांनी काही महत्त्वाचे आकडे मांडले. त्यांनी सांगितले की, या निवडणुकीत द्रमुक आघाडीला एकूण १ कोटी ५४ लाख ८२ हजार ७८२ मते मिळाली आहेत. विजयी पक्ष आणि द्रमुक यांच्यातील मतांतील फरक फार मोठा नाही. विजयी पक्षाला द्रमुकपेक्षा केवळ १७.४३ लाख मते अधिक मिळाली, जे एकूण मतांच्या टक्केवारीत फक्त ३.५२ टक्क्यांचा किरकोळ फरक आहे.

या संदर्भात स्टालिन यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत सांगितले की, द्रमुक सहा वेळा सत्तेत राहिली आहे. अशी कोणतीही जिंक किंवा हार नाही ज्याचा पक्षाने सामना केलेला नाही. त्यांनी सांगितले की, सत्तेत असतो तर जनतेसाठी योजना राबवल्या असत्या, मात्र आता विरोधी पक्षात राहून जनतेच्या मागण्यांसाठी पूर्ण ताकदीने लढणार आहोत. द्रमुक एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे काम करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळच्या निवडणूक निकालांनी संपूर्ण राज्याला धक्का दिला आहे. पहिल्याच निवडणुकीत टीव्हीके पक्षाने दमदार कामगिरी करत २३४ सदस्यांच्या विधानसभेत १०७ जागा जिंकल्या. मात्र, बहुमतासाठी लागणाऱ्या आकड्यापेक्षा हा पक्ष ११ जागांनी कमी पडला आहे. दुसरीकडे द्रमुक फक्त ५९ जागांवरच मर्यादित राहिली आहे. आता सरकार स्थापनेसाठी टीव्हीकेकडून काँग्रेस, डावे पक्ष, माकपा आणि व्हीसीकेसारख्या छोट्या पक्षांचा पाठिंबा घेण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीतील सर्वात मोठा आणि आश्चर्यकारक निकाल स्वतः द्रमुक प्रमुख एम. के. स्टालिन यांच्या मतदारसंघात पाहायला मिळाला. कोलाथूर विधानसभा मतदारसंघात स्टालिन यांना टीव्हीकेचे उमेदवार व्ही. एस. बाबू यांनी ८,७९५ मतांनी पराभूत केले. मतांच्या टक्केवारीतही टीव्हीके ३२ टक्क्यांहून अधिक मतांसह आघाडीवर राहिली. तर द्रमुकला २४.१९ टक्के आणि अन्नाद्रमुकला २१.२२ टक्के मते मिळाली, ज्यातून या दोन्ही प्रमुख पक्षांची घसरण स्पष्ट दिसून येते.

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi