Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पशुधन विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक : डॉ. किरण पाटील

पशुधन विकासासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक : डॉ. किरण पाटील

रायगड, 02 जून (हिं.स.)। : राज्यातील खासगी कृत्रिम रेतन (Artificial Insemination) सेवादात्यांनी केलेल्या कामाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक असून, त्याद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांची अचूक संख्यात्मक माहिती उपलब्ध होण्यास मदत होईल.

तसेच पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा व गुणवत्ता अधिक प्रभावीपणे वाढविणे शक्य होईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले.

औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या कामधेनू सभागृहात 'गोजातीय प्रजनन व नियमन' या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन व नियमन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यशाळेचे अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यशाळेला विविध तज्ज्ञ अधिकारी, सेवा पुरवठादार आणि संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची प्रभावी अंमलबजावणी, कृत्रिम रेतन सेवांचे व्यवस्थापन आणि नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (NDLM) अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंगचे तांत्रिक एकत्रीकरण या विषयांवर कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त व प्राधिकरणाचे सदस्य डॉ. देवेंद्र जाधव यांच्या प्रास्ताविकाने झाली. डॉ. किरण पाटील यांनी कृत्रिम रेतन सेवेमध्ये पारदर्शकता आणि डिजिटल नोंदणीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, राज्यात उच्च उत्पादनक्षम पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. या उद्दिष्टपूर्तीसाठी खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी पशुसंवर्धन विभागासोबत समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. विभागाकडून त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात बायफ, पुणे येथील डॉ. जयंत खडसे यांनी गोजातीय पैदाशीतील अनुभव मांडले. तर चितळे-ABS जेनस प्रा. लि.चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी 'जेनोमिक्स आणि सेक्स्ड सीमेन' या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. सहाय्यक आयुक्त डॉ. राजू कोलते यांनी भारत पशुधन प्रणालीचा वापर आणि त्याची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi