Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पाटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती - आबिटकर

मुंबई, 02 जून (हिं.स.) : पाटण तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, अश माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

पाटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या वाढीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई , सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई रवीद्रन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच सातारा, पाटण येथील आरोग्य विभागाचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी रुग्णालयातील मनुष्यबळ, बांधकामाची सद्यस्थिती आणि भविष्यातील सुविधा यांचा सविस्तर आढावा घेतला. सध्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या प्रकल्पाला २७.१८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता तसेच २३.४२ कोटी रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.

प्रस्तावित उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ओपीडी विभागासह शस्त्रक्रिया, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, एक्स-रे, सोनोग्राफी यांसह विविध सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच मुख्य इमारतीमध्ये लेबर रूम, ऑपरेशन थिएटर, कॅज्युअल्टी वॉर्ड, एएनसी-पीएनसी वॉर्ड, मेडिकल-सर्जिकल वॉर्ड, आयसीयू, डायलिसिस आणि बर्न वॉर्ड यांसारख्या सुविधा उभारण्यात येणार आहेत.

प्रकल्पाचा कार्यारंभ आदेश सप्टेंबर २०२३ मध्ये देण्यात आला असून मुदतवाढीनंतर सप्टेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्या ओपीडी इमारतीचे आरसीसी बांधकाम पूर्ण झाले असून एकूण कामाच्या सुमारे १० टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सुमारे १.८५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामाचा वेग वाढविण्याचे, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आणि रुग्णसेवेत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, पाटणसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा त्यांच्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, ही शासनाची प्राथमिकता आहे. १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय पूर्ण झाल्यानंतर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी, जमीन अधिग्रहण आणि प्रशासकीय बाबींमध्ये कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करावा.

आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पाटण उपजिल्हा रुग्णालयाचा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi