Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फ्रेंच ओपनमधील नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात

फ्रेंच ओपनमधील नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात

Hindusthan Samachar 4 months ago

पॅरिस, 30 मे (हिं.स.) : फ्रेंच ओपन २०२६ मध्ये टेनिस जगताला धक्का देणारा निकाल लागला. २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा मानकरी, सर्बियन दिग्गज नोव्हाक जोकोविच, तिसऱ्या फेरीत युवा ब्राझिलियन टेनिसपटू जोआओ फोन्सेकाकडून पराभूत झाला.

रोलँड गॅरोसच्या कोर्टवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, जोकोविचने पहिले दोन सेट ६-४, ६-४ असे जिंकून शानदार सुरुवात केली. हा अनुभवी टेनिसपटू सहजपणे पुढच्या फेरीत जाईल असे वाटत होते, पण त्यानंतर सामन्याचे चित्र पूर्णपणे पालटले. फोन्सेकाने जबरदस्त पुनरागमन करत पुढचे तीन सेट ६-३, ७-५ आणि ७-५ असे जिंकले आणि पाच सेटच्या या सामन्यात एक मोठा उलटफेर घडवला.

या वर्षी जोकोविचकडे इतिहास रचण्याची सुवर्णसंधी होती. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला यानिक सिनर स्पर्धेतून आधीच बाहेर पडला होता, तर गतविजेता कार्लोस अल्कारज दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नाही. जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावू शकतो, असा व्यापक विश्वास होता. पण फोन्सेकाकडून झालेल्या पराभवाने ती आशा धुळीस मिळवली. जोकोविचच्या बाहेर पडण्याने हे देखील निश्चित झाले की, पॅरिसमधील पुरुष एकेरी प्रकारात यावेळी एक नवीन ग्रँडस्लॅम विजेता असेल. ओपन युगामध्ये असे पहिल्यांदाच घडेल की, फ्रेंच ओपनच्या अंतिम १६ च्या फेरीत कोणताही माजी पुरुष ग्रँडस्लॅम विजेता टेनिसपटू खेळणार नाही.

पराभवानंतर, त्याच्या भविष्याबद्दल सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. ३९ वर्षीय जोकोविचला विचारण्यात आले की, फ्रेंच ओपनमधील हा त्याचा शेवटचा सामना होता का आणि तो पुढच्या वर्षी परत येईल का. त्याने स्पष्ट उत्तर देण्यास नकार दिला. जोकोविच म्हणाला, मला माहीत नाही. फ्रेंच ओपनमध्ये आपल्या कारकिर्दीचा शेवट करण्यास तो तयार आहे का, असे पुन्हा विचारले असता, त्याचे उत्तर तेच राहिले. तो म्हणाला, मला माहीत नाही. त्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त करत म्हटले, आत्ता याबद्दल विचार करणे खूप कठीण आहे. तुम्ही माझी परिस्थिती समजू शकता.

सामन्यानंतर, जोकोविचने रोलँड गॅरोसच्या प्रेक्षकांचे आभारही मानले. सामन्याच्या अंतिम टप्प्यात आपल्याला शारीरिक त्रास जाणवत होता, हे त्याने कबूल केले. जोकोविच म्हणाला, सामन्याच्या शेवटी काही वेळा मला असे वाटत होते की मी माझ्या पायावर धड उभाही राहू शकत नाही. पण जेव्हा मी प्रेक्षकांकडे पाहिले आणि त्यांचा पाठिंबा अनुभवला, तेव्हा तो क्षण खरोखरच जादुई होता. तो पुढे म्हणाला, पराभवाची निराशा आणि नकारात्मक विचार बाजूला ठेवल्यास, मला माझ्या प्रवासाचा आणि येथे मिळालेल्या अनुभवांचा अभिमान आहे. मी या अनुभवाबद्दल खूप आभारी आहे.

जोकोविचने यापूर्वी संकेत दिले आहेत की, त्याला २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत खेळायचे आहे. पण, वाढत्या वयामुळे तंदुरुस्ती त्याच्यासाठी एक मोठे आव्हान बनत आहे. त्याने शेवटचे ग्रँड स्लॅम विजेतेपद २०२३ च्या यूएस ओपनमध्ये जिंकले होते. तेव्हापासून, तो अनेक मोठ्या स्पर्धांच्या उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला आहे, परंतु पाच-सेटच्या लांब सामन्यांमध्ये तो तेच सातत्य दाखवू शकलेला नाही. फोन्सेकाविरुद्धच्या सामन्यातही, दोन सेटची आघाडी असूनही शारीरिक थकवा आणि लयीत झालेली घसरण स्पष्टपणे दिसत होती.

अनेक तज्ज्ञ जोकोविचच्या पराभवाला पुरुष टेनिसमधील पिढीगत बदलाचे लक्षण मानतात. फोन्सेकासारखे तरुण टेनिसपटूअ मोठ्या स्तरावर दिग्गजांना केवळ आव्हानच देत नाहीत, तर त्यांना पराभूत करून पुढेही जात आहेत. त्यामुळे, प्रश्न केवळ जोकोविच पुढचा ग्रँड स्लॅम जिंकेल की नाही हा नाही, तर टेनिस जगताने रोलँड गॅरोस येथे त्याच्या कारकिर्दीचा शेवटचा अध्याय पाहिला आहे का, हाही आहे. सध्या, खुद्द जोकोविचकडेही याचे उत्तर नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi