Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पिंपरी-शहरासाठी स्वतंत्र टॉयलेट पॉलिसी; सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण सुरू

पिंपरी, 02 जून (हिं.स.) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले, रस्ते, स्वच्छता व्यवस्था, अतिक्रमण निर्मूलन, हॉकर्स व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहांचे आधुनिकीकरण, वृक्षारोपण, पालखी सोहळ्याची तयारी आणि अग्निसुरक्षा यांसह विविध विषयांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात बैठक घेतली.

बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देताना आयुक्तांनी शहरातील नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहण्यासाठी साफसफाईची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यावर भर दिला. ज्या ठिकाणी कामे पूर्ण झाली आहेत, तेथे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाल्यांची रुंदी, खोली आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता तपासून अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले.अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी नियमित निरीक्षण ठेवावे. फुटपाथ, मोकळ्या जागा आणि महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील अतिक्रमणांवर सातत्याने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच फेरीवाल्यांसाठी क्षेत्रनिहाय हॉकर्स झोन निश्चित करून त्यांना अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या.शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो, त्या ठिकाणांचे सुशोभीकरण, हरितीकरण किंवा वृक्षारोपण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता वाढेल आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा साचण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय अनधिकृत फ्लेक्स, बेकायदेशीर जाहिरात फलक आणि विनापरवाना जाहिरातींवर नियमित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. शहरासाठी स्वतंत्र 'टॉयलेट पॉलिसी' तयार करण्यात येत असून सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. जीर्णावस्थेतील स्वच्छतागृहे आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच महिलांसाठी बसविण्यात आलेल्या सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन कार्यरत असल्याची नियमित तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi