Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे विषारी दारूकांड : 22 जणांचा मृत्यू, 22 अधिकारी-कर्मचारी निलंबित

पुणे विषारी दारूकांड : 22 जणांचा मृत्यू, 22 अधिकारी-कर्मचारी निलंबित

- एकूण 645 लिटर विषारी दारू जप्त - मुख्य आरोपी योगेश वानखडेविरुद्ध यापूर्वीही तीन गुन्हे दाखल

- पोलीस महासंचालकांकडून गंभीर दखल

मुंबई / पुणे, 30 मे (हिं.स.) - पुण्यात विषारी दारुमुळे दोन दिवसात २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये पुण्यात 7, पिंपरी-चिंचवडमध्ये 14 आणि उरुळी कांचनमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आतापर्यंत जवळपास पोलीस दल आणि उत्पादन शुल्क विभागातील २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. यात पुणे पोलीस दलातील ३ अधिकारी, पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील ६ आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील १३ जणांचा समावेश आहे. निलंबित झालेल्यांमध्ये निरीक्षक, उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने उपरोक्त प्रकरणात मोठी कारवाई करून एकूण 645 लिटर विषारी दारू जप्त केली आहे. या कारवाईबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे अधीक्षक अतुल कानडे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, तपास करत असताना हडपसरमधून 70 लिटर, दापोडीमधून 155 लिटर आणि गोखले नगरमधून 420 लीटर असं एकूण 645 लिटर विषारी दारू जप्त केली. मुख्य आरोपी योगेश वानखडेविरुद्ध यापूर्वीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी विभागाकडून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता. जो सद्यस्थितीत प्रक्रियेत होता. दुर्घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं संपूर्ण पुणे जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागात इतर जिल्ह्यांतून अतिरिक्त कर्मचारी बोलावून कारवाया तीव्र केल्या आहेत. आतापर्यंत 55 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून 50 हून अधिक जणांना ताब्यात घेतलं आहे.

विषारी दारू मृत्यू प्रकरणाची गंभीर दखल पोलीस महासंचालकांनी घेतली आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांकडून सर्व कागदपत्रे, पंचनामे आणि तपासाचा अहलात ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

इकोसिस्टिम नष्ट करू - मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विषारी दारू मृत्यू प्रकरण हे एक प्रकारे हत्याच असल्याचं म्हटलं आहे. या घटनेत अतिशय कठोर कलमे लावली जात आहेत. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढू आणि अशा प्रकरणांची इकोसिस्टिम नष्ट करण्यात येईल, असंही फडणवीस म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi