Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात 3,700 कोटींचे मेफेड्रोन जप्त

पुण्यात 3,700 कोटींचे मेफेड्रोन जप्त

पुणे, 03 जून (हिं.स.)। पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ आणि सांगली परिसरात धाडसत्र राबवत तब्बल 3,700 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून अमली पदार्थ निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा मोठा साठा उघडकीस आला आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल विश्रांतवाडी परिसरात एका टेम्पोमध्ये लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी छापा टाकून सुमारे 340 किलो कच्चा माल जप्त केला. या साठ्यात विविध रासायनिक पदार्थांचा समावेश असून त्यांचा वापर मेफेड्रोन आणि मेथसारखे अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

जप्त करण्यात आलेला कच्चा माल न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यातून नेमक्या रासायनिक घटकांची माहिती समोर येणार आहे.

दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात मेफेड्रोनची निर्मिती सुरू असल्याचे तपासात उघड झाले होते. पोलिसांनी तेथे छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते.

या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, मेफेड्रोन तस्करीचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया हा परदेशात फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. अटक आरोपींच्या चौकशीतून अमली पदार्थांच्या देश-विदेशातील तस्करीचे विस्तृत जाळे उघड होत असून, पोलीस तपास अधिक वेगाने सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi