Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

पुण्यात रंगणार केंद्रीय विद्यालय संगठनची राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

* 25 संघांतील 350 खेळाडूंचा सहभाग; 26 ऑक्टोबरला उद्घाटन, 1 नोव्हेंबरला अंतिम सामना

पुणे, 25 ऑक्टोबर (हिं.स.) - केंद्रीय विद्यालय संगठनच्या 55या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2026-27 अंतर्गत 17 वर्षांखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय विद्यालय संगठन, क्षेत्रीय कार्यालय मुंबई यांच्या आयोजनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 आणि 2, वायुसेना स्थल, पुणे भूषवणार आहेत. स्पर्धेत 25 संघांतील सुमारे 350 खेळाडू सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता लोहगाव येथील गुरुद्वारा कॉलनीतील एकेपीसी क्रिकेट मैदानावर होणार आहे. एअर कमोडोर सतबीर सिंह राय, व्हीएम, एअर ऑफिसर कमांडिंग, 2 विंग, वायुसेना स्थल, पुणे तथा पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 च्या विद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभात हरित स्वागत, स्वागतगीत, ध्वज समारंभ, संचलन, क्रीडाज्योत दौड, खेळाडूंचा शपथविधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेच्या शुभारंभाची घोषणा करण्यात येणार आहे.

स्पर्धेतील सामने गुरुद्वारा परिसरातील एकेपीसी क्रिकेट मैदान, वीरांगण क्रिकेट अकादमी, विज्डम क्रिकेट अकादमी, लोहगाव आणि महालक्ष्मी क्रिकेट अकादमी, खराडी या चार मैदानांवर खेळविण्यात येणार आहेत. सुरुवातीला गटवार साखळी सामने होतील. त्यानंतर प्रत्येक गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविणाऱ्या संघांमधून उपांत्यपूर्व फेरीसाठी संघ निश्चित केले जातील. पुढे उपांत्य फेरीचे सामने होतील आणि 1 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना रंगणार आहे.

सामन्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी (एमसीए) संलग्न 20 पंचांची व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागी खेळाडू निवासाची व्यवस्था केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 व 2, वायुसेना स्थल, पुणे येथे करण्यात आली आहे.

केंद्रीय विद्यालय संगठन, मुंबई विभागाचे उपायुक्त श्री बी. के. बेहरा यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 चे प्राचार्य श्री राजेंद्र वडाळकर आणि केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 चे प्राचार्य श्री भारत भूषण यांच्या नेतृत्वात आयोजनाची तयारी करण्यात येत आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेमुळे युवा क्रिकेटपटूंना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार असून, संघभावना, शिस्त आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi