Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात विषारी दारूचा कहर; मृतांचा आकडा 21 वर, 10 जण अटकेत

पुण्यात विषारी दारूचा कहर; मृतांचा आकडा 21 वर, 10 जण अटकेत

पुणे, 30 मे (हिं.स.) : पुण्यातील विषारी दारू प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून गेल्या दोन दिवसांत मृतांचा आकडा 21 वर पोहोचला आहे. सुरुवातीला सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती, मात्र त्यानंतर मृतांची संख्या झपाट्याने वाढल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

मृतांमध्ये पुण्यातील सात, पिंपरी-चिंचवडमधील 14 आणि उरुळी कांचन येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. हडपसरमधील पांढरेवाडी परिसरात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने पुणे शहरातील मृतांची संख्या सातवर पोहोचली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांना अटक केली असून तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे. तसेच कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांसह एकूण 23 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांमध्ये 32 वर्षीय रिक्षाचालक उमेश अवचर याचाही समावेश आहे. मृत्यूपूर्वी त्याची दृष्टी अधू झाली होती. याशिवाय मळमळ, उच्च रक्तदाबाचा त्रास आणि तोंडातून फेस येणे अशी गंभीर लक्षणे त्याच्यामध्ये दिसून आली होती. दोन दिवसांपूर्वी त्याने दारूचे सेवन केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणात पुणे पोलीस दलातील तीन अधिकारी, पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील सहा अधिकारी-कर्मचारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबितांमध्ये निरीक्षक, उपनिरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तपासादरम्यान मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती याने उरुळी कांचन परिसरात विषारी दारू तयार केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, त्याच परिसरातील दारू गुत्त्यावरून उमेश अवचर याने दारू खरेदी करून सेवन केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे विषारी दारूचे जाळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडपुरते मर्यादित नसून उरुळी कांचनपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेमुळे बेकायदा दारू निर्मिती आणि विक्री रोखण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून विषारी दारू प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

----------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi