Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राजस्थान आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये; हैदराबादचे आव्हान संपुष्टात

राजस्थान आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये; हैदराबादचे आव्हान संपुष्टात

न्यू चंदीगड, 28 मे (हिं.स.)राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादला पराभूत करून आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचा सामना २९ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे.

गुजरातचा संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून पराभूत झाला होता. दुसऱ्या क्वालिफायरचा विजेता ३१ मे रोजी होणाऱ्या टायटल मॅचमध्ये बंगळूरुचा सामना करेल. एलिमिनेटरमध्ये राजस्थानने पॅट कमिन्सच्या हैदराबाद संघाला ४७ धावांनी पराभूत केले. या लीगमध्ये हैदराबादच्या विजयात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने २९ चेंडूंमध्ये ९७ धावा केल्या. सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादसमोर २४४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, पॅट कमिन्सचा संघ १९.२ षटकांत १९६ धावांवर सर्वबाद झाला. जोफ्रा आर्चरने तीन बळी घेतले, तर नांद्रे बर्गर, सुशांत मिश्रा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर हैदराबादने राजस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, जो एक चुकीचा निर्णय ठरला. सूर्यवंशीने यशस्वी जैस्वालसोबत मिळून हैदराबादच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. या राजस्थानच्या सलामीच्या जोडीने आठ षटकांत १२५ धावांची भागीदारी केली, जी प्रफुल्ल हिंगेने तोडली. ख्रिस गेलच्या नावावर असलेला सर्वात जलद आयपीएल शतकाचा विक्रम सूर्यवंशी पूर्ण करण्यापासून केवळ तीन धावा दूर राहिला. सूर्यवंशी बाद झाल्यानंतर लगेचच जैस्वालही २९ धावांवर बाद झाला. त्यानंतर ध्रुव जुरेलने अर्धशतक झळकावले. कर्णधार रियान परागने १२ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या. २०७ धावांवर परागची चौथी विकेट पडल्यानंतर राजस्थानच्या डावाची गती मंदावली. त्याच्यानंतर दसुन शनाकाने ५ धावा, डेव्हन फरेराने १२ धावा, जोफ्रा आर्चरने ४ धावा, नंद्रे बर्गरने १ धाव आणि रवींद्र जडेजाने १२ धावा नाबाद केल्या.

२४४ धावांचे लक्ष्य गाठताना हैदराबादची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. अभिषेक बाद झाल्यानंतर, ईशान किशनने ट्रॅव्हिस हेडसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो ११ चेंडूंमध्ये ३३ धावा करून बाद झाला. रविचंद्रन स्मृती आणि हेड हेही बाद झाले, त्यामुळे हैदराबादची अवस्था ५७ धावांवर चार गडी बाद अशी बिकट झाली. हेनरिक क्लासेनही या मोठ्या सामन्यात अपयशी ठरला आणि केवळ १८ धावाच करू शकला. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीने २० चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या आणि सलील अरोराने २१ चेंडूंमध्ये ३५ धावा करून डाव सावरला. मात्र, त्यांच्या बाद होण्याने हैदराबादच्या शेवटच्या आशाही मावळल्या. कर्णधार पॅट कमिन्सलाही केवळ एक धाव करता आली.

शिवांग कुमारने २४ चेंडूंत २७ धावा करून आशा पल्लवित केल्या, पण ईशान मलिंगा आणि शकिब हुसेन बाद झाल्यानंतर शिवांगच्या रूपाने हैदराबादला अखेरचा धक्का बसला आणि संघ १९६ धावांवर गारद झाला. यासह, या स्पर्धेतील हैदराबादचा प्रवास संपुष्टात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi