बीड, ३१ जुलै (हिं.स.) : बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल समिती तसेच ऑलिम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन समितीची आढावा बैठक पार पडली.
यावेळी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे शिस्तबद्ध, दर्जेदार आणि राज्याच्या प्रतिष्ठेला साजेसे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा, वाहतूक, सरावासाठी आवश्यक सुविधा तसेच क्रीडारसिकांसाठीही उत्तम नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्पर्धेच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यावर त्यांनी भर दिला.
बैठकीला खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार संदीप क्षिरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, पालक सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा संकुल विकासाला गती
जिल्हा क्रीडा संकुलाच्या ₹२५ कोटींच्या विकास आराखड्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर कामांना तातडीने गती देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील व्यायामशाळांना जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) निधीतून आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या समृद्ध क्रीडा परंपरेचा गौरव करत ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. क्रीडा विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

