Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राष्ट्रवादी काँग्रेसला परभणीत मोठा धक्का; प्रथम महापौरांसह प्रमुख सहकाऱ्यांचेही राजीनामे

राष्ट्रवादी काँग्रेसला परभणीत मोठा धक्का; प्रथम महापौरांसह प्रमुख सहकाऱ्यांचेही राजीनामे

रभणी, 08 जुलै (हिं.स.)। परभणीच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा ,परभणीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. परभणी महानगरपालिकेचे प्रथम महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप (भैय्या) देशमुख यांनी पक्षाच्या सर्व पदांचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

त्यांच्या काही प्रमुख सहकाऱ्यांनीही पक्षाची साथ सोडल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

प्रताप देशमुख हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून, पक्षाच्या शहर संघटनेसमोर नव्या आव्हानांची चर्चा सुरू झाली आहे.

राजीनाम्यानंतर प्रताप देशमुख हे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र, या वृत्ताला त्यांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

प्रताप (भैय्या) देशमुख म्हणाले, मी माझ्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पुढील राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर योग्य वेळी पुढील निर्णय जाहीर करणार आहे.

परभणी महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून प्रताप देशमुख यांनी शहराच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली. शहरातील त्यांचा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे लक्षात घेता त्यांच्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर संघटनेवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रताप देशमुख यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास परभणीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi