Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

राष्ट्रीय खत विक्री आराखड्यांतर्गत 'एफएसएएस' प्रणालीद्वारे खत विक्रीला सुरुवात

छत्रपती संभाजीनगर, 28 मे (हिं.स.)।

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत आयएफएमएस व अॅग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात येत असून खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता आणण्यासाठी केंद्र शासनाने 'फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम' (एफएसएएस) हे मोबाईल आधारित ॲप विकसित केले आहे.

या मोबाईल ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना क्यूआर कोडद्वारे खतांचे ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्यांनी क्यूआर कोडद्वारे खत बुक केल्यानंतर संबंधित क्यूआर कोड तीन दिवस वैध राहणार असून, त्या कालावधीत शेतकरी आपल्या सोयीनुसार निवडलेल्या खत विक्रेत्याकडून खत खरेदी करू शकतील.

या ऑनलाइन बुकिंग प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच आवश्यक त्या खतांचेच बुकिंग केल्यामुळे इतर अनावश्यक खतांची सक्ती दुकानदारांकडून होण्याची शक्यता कमी होणार असून खत विक्री प्रक्रियेत अधिक सुलभता व पारदर्शकता निर्माण होणार आहे.

सध्या अनेक वेळा दुकानांमध्ये खत उपलब्ध आहे की नाही, याची माहिती शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नव्या प्रणालीमुळे उपलब्ध साठ्याची माहिती सहज मिळणार असल्याने अशा अडचणी टाळण्यास मदत होणार आहे.

केंद्र शासनाच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील अष्टापुर येथे या वितरण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. तसेच राज्यातील कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांची केंद्र शासनाने पथदर्शी प्रकल्पासाठी निवड केली असून आगामी खरीप हंगामात 'फर्टिलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम'द्वारे खत विक्रीला प्रारंभ करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi