Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

रत्नागिरी : दीड हजार रोपे लावून राजापूर पालिकेचा १५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प सुरू

त्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । राजापूर नगरपरिषदेच्या अभिमानाची १५० वर्षे या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमांतर्गत शहरात १५ हजार वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेण्यात आला असून, या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज पथावरील नवजीवन कॉलेजच्या मागील परिसरात उत्साहात झाला.

पहिल्या टप्प्यात १,५०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

या वृक्षारोपण अभियानाचा प्रारंभ नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभापती, नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नवजीवन हायस्कूलचे प्राचार्य व्हनमाने आणि शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वृक्षारोपणानंतर वृक्षांचे संगोपन व नियमित देखभालीची जबाबदारी नवजीवन हायस्कूल व कॉलेजकडे सोपविण्यात आली असून, संस्थेने ती स्वीकारली आहे. यावेळी बोलताना नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी सांगितले की, पुढील टप्प्यात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार असून, संबंधित संस्थांकडेच वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी सोपविली जाणार आहे. त्यामुळे केवळ वृक्ष लागवड न करता त्यांच्या संवर्धनालाही प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास नगरसेवक जमीर खलिफे, सुलतान ठाकूर, सौरभ पेणकर, सुबोध पवार, दिलीप चव्हाण, सौरभ खडपे तसेच नगरसेविका सानवी रावण, प्रेरणा नार्वेकर, साजिया काझी, शबाना मुल्ला, अमिना गडकर, जान्हवी वादक, सुयोगा जठार, नेहा तानवडे, उर्मिला बाकाळकर, अजीम जैतापकर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि नवजीवन शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजापूर नगरपरिषदेच्या १५० व्या वर्धापन वर्षानिमित्त राबविण्यात येणारा १५ हजार वृक्ष लागवडीचा हा उपक्रम शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, या अभियानात नागरिकांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi