Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रत्नागिरी रेल्वे स्थानक दुर्घटनाप्रकरणी दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

रत्नागिरी रेल्वे स्थानक दुर्घटनाप्रकरणी दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी

त्नागिरी, 8 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी रेल्वे स्थानकावर घडलेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी करून यास जबाबदार असणाऱ्या ठेकेदारांसहित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष रूपेश जाधव यांच्या नेतृत्वात मनसे पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत सुमारे ४० कोटी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात आलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकातील सजावटीच्या छताचा काही भाग पुन्हा कोसळला आहे. उद्घाटनापूर्वीही अशीच घटना घडली होती. या घटनेमुळे कामाच्या गुणवत्तेवर, प्रवाशांच्या सुरक्षेवर आणि संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या रविवारी, ५ जुलै रोजी मध्यरात्री ११.०० च्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकावर रेल्वे रिक्षा स्टँडकडील छताचा मोठा भाग कोसळला.

वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नव्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सुशोभीकरण करण्यात आले होते. आतापर्यंत या निकृष्ट व दर्जाहीन सुशोभीकरणाच्या कामात छत कोसळल्याचे दोन वेळा दुर्दैवी प्रकार घडलेले असून सुदैवाने त्यात जीवितहानी झालेली नाही परंतु या कामाचा निकृष्ट दर्जा पाहता भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या संपूर्ण कामाची निष्पक्ष चौकशी करून या कामाचे ऑडिट करण्यात यावे व संबंधित ठेकेदाराला तत्काळ काळ्या यादीत टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची जबाबदारीदेखील निश्चित करण्यात यावी, अशी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आहे.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आश्वासन दिले असून या गंभीर घटनेची प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने आपल्या निवेदनात दिला आहे.निवेदन देताना तालुकाध्यक्ष रूपेश जाधव यांच्यासह चैतन्य शेंडे, सर्वेश जाधव, तेजस नागवेकर, सुजित घाणेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi