रत्नागिरी, 27 ऑगस्ट (हिं.स.) । गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करताना शासनाच्या उपक्रमांतर्गत तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील उत्कृष्ट मंडळांची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सात सदस्यीय जिल्हास्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीची रचना अशी - अध्यक्ष: उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), शासकीय सदस्य: पोलिस उपअधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, अशासकीय सदस्य: समीर इंदुलकर आणि राहुल कळंबटे, सदस्य सचिव: जिल्हा नियोजन अधिकारी तालुकास्तरावरून प्राप्त झालेले परीक्षण अहवाल, छायाचित्रे, व्हिडीओ आणि आवश्यक कागदपत्रांच्या आधारे शासनाच्या निकषांनुसार मंडळांचे गुणांकन केले जाईल. प्राप्त गुणांनुसार पहिल्या तीन क्रमांकाच्या मंडळांची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात येईल.
दोन किंवा अधिक मंडळांना समान गुण मिळाल्यास, ज्या मंडळाची स्थापना अधिक वर्षांपूर्वी झाली आहे, त्या जुन्या मंडळाला प्राधान्य दिले जाईल. स्पर्धेत कोणत्याही विभागून पारितोषिक दिले जाणार नाही.विजेत्या मंडळांना मिळणारी पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे ५० हजार, ४० हजार आणि ३० हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी
