Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

रत्नागिरी : शिक्षकाअभावी शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग अचानक बंद

त्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । अणुसरे (ता. राजापूर) येथील श्री सिद्धिविनायक विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग शिक्षकाअभावी बंद पडले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तसेच ग्रामस्थांनी आज राजापूर पंचायत समितीवर मोर्चा काढून शिक्षक नेमण्याची मागणी केली.

अणुसरे येथील श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयातील आठवी ते दहावीचे वर्ग अचानक बंद पडल्याने विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी पालक व ग्रामस्थांनी पंचायत समितीवर धडक देत सभापती नंदिनी कदम यांना निवेदन सादर केले. तसेच तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदने देण्यात आली आहे.

चालू शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गावकऱ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांच्या बदल्या झाल्याची माहिती मिळाली. मात्र त्यांच्या जागी अद्याप नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सुमारे ३० वर्षांपूर्वी अणुसरे गावात मुलींच्या शिक्षणासाठी विशेष बाब म्हणून या माध्यमिक शाळेची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी गावाजवळ माध्यमिक शिक्षणाची सुविधा नसल्याने अनेक मुलींना सातवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. ग्रामस्थांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या शाळेने गेल्या तीन दशकांत हजारो विद्यार्थ्यांना घडविले असून अनेक विद्यार्थी डॉक्टर, नर्स, अभियंते, वकील, शिक्षक, सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, सैनिक तसेच विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत. शाळेचा दहावीचा निकालही अनेक वेळा शंभर टक्के लागल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरात दुसरी कोणतीही माध्यमिक शाळा उपलब्ध नसल्याने शाळा कायमस्वरूपी बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. गावातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही प्रश्न गंभीर बनणार असल्याने शासनाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये, यासाठी शासनाने तातडीने आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करून अणुसरे येथील श्री सिद्धिविनायक माध्यमिक विद्यालयातील ८ वी ते १० वीचे वर्ग पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी ग्रामपंचायत, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, पंढरीनाथ मयेकर आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi