Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रायगड जिल्ह्यातील भातलावणीला वेग

रायगड जिल्ह्यातील भातलावणीला वेग

रायगड, 02 जुलै (हिं.स.) : उशिराने का होईना, दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर अलिबाग तालुक्यातील चौलमळा परिसरात खरीप हंगामाला वेग आला आहे. गुरुवारी (दि. २) शेतकरी जीवन लोहार यांच्या शेतातून भातलावणीला सुरुवात झाली असून, काही दिवसांत संपूर्ण शिवार हिरवेगार होईल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

पहिल्या पावसाची चाहूल लागताच धूळवाफेची पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी आता भातलावणीच्या कामाला सुरुवात केली आहे. चौलमळा येथे महिला, शेतमजूर आणि कुटुंबातील सदस्य चिखलात उतरून लावणी करत असल्याचे उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळत आहे. पावसाच्या सरी आणि चिखलात सुरू असलेली लगबग यामुळे खरीप हंगामाला खरी सुरुवात झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून हवामानातील बदल, अतिवृष्टी, पावसाचा खंड आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी अडचणीत सापडत आहे. यंदाही पावसाने सुरुवातीला हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भातलावणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत.

शेतकरी जीवन लोहार म्हणाले, दरवर्षी काही ना काही संकटांना सामोरे जावे लागते. यंदा पाऊस उशिरा आल्याने चिंता होती. आता पावसाने चांगली साथ दिली आहे. पुढेही अशीच साथ मिळाली तर भाताचे पीक चांगले येईल आणि वर्षभराच्या कष्टाचे चांगले फळ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांच्या मेहनतीला निसर्गाची साथ लाभल्यास येत्या काही दिवसांत अलिबाग तालुक्यातील शिवार हिरव्यागार भातशेतीने बहरून जाईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi