Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार - आशिष शेलार

रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार - आशिष शेलार

मुंबई, 02 जून (हिं.स.)। रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा, रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन तसेच रायगड विकास प्राधिकरणाच्या कार्यप्रणालीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी संयुक्त स्थळ पाहणी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

रायगड किल्ला विकास पर्यटन आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, महसूल विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, उपसचिव महेश वाव्हळ, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे तसेच रायगड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या जतन संवर्धन व विकासकामांची माहिती देण्यात आली. शिरकाई मंदिर, महादरवाजा आणि वाघ दरवाज्याच्या संवर्धनाची कामे सुरू असून राणी वसाहतीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. तसेच हत्ती तलाव व फुटका तलाव परिसरातील गाळ काढणे आणि गळती रोखण्याची कामेही सुरू असल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, रायगडावरील स्वच्छतागृहे, त्यांची देखभाल आणि पाणीपुरवठा यासंदर्भातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावर मंत्री ॲड. शेलार यांनी पुरातत्व विभाग, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय), जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदार यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुस्थितीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. या पाहणीनंतर लवकरच मंत्रालयात एक बैठक घेऊन रायगड विकास प्राधिकरणाची स्वायत्तता, उपलब्ध निधी, देखभाल व्यवस्था, जनसुविधांचे व्यवस्थापन आणि विविध विभागांमधील जबाबदाऱ्या यावर व्यापक चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi