Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रेल्वेत मृत्यू हे होतच राहणार...

रेल्वेत मृत्यू हे होतच राहणार...

रेल्वेत मृत्यू हे होतच राहणार...

वरील शिर्षक बेजबाबदार किंवा सनसनाटी निर्माण करण्यासाठी नव्हे तर जाणीवपूर्वक व २५ वर्षाच्या अनुभवाने दिले आहे.

होय ! रेल्वेच्या डब्यातून पडून मृत्यू व हाणामारीत खून हे होतच रहाणार.

कारण "मी आणि माझे मित्रमंडळीचे हित व डब्यात मिळवलेली नव्हे नव्हे तर रेल्वेच्या डब्यात विकत घेतलेली जागा माझीच. हि भावना प्रत्येक प्रवाश्याच्या मनात बिंबविणारे समाज विघातक समूह( ग्रुप ) जो पर्यंत बंद होत नाहीत तो पर्यंत कोणतीही योजना/ यंत्रणा, कोणताही नियम / कायदा, कोणताही रेल्वे अधिकारी/मंत्री हे मृत्यू टाळू शकत नाहीत." हे विधान वर वरचे नाही तर काळ्या दगडावरची रेष आहे.

परवाचा असो किंवा याआधीचा खून असो जरी तो एकट्याने केला असला तरी मानसिकता हीच आहे. " माझे कोण काय वाकडे करणार ?"व मला काय त्याचे मला उद्या पुन्हा प्रवास करायचा आहे. ही मानसिकता तो खून पाहणाऱ्यांची होती, आहे व पुढे ही रहाणार. ह्याला कारण प्रत्येक डब्यात, प्रत्येक दारावरचे ग्रुप म्हणजेच चौकीदार. सुरुवातीच्या स्टेशनवरून दारातील पुढील भागात (मधल्या दांड्याच्या पुढील अर्ध्या भागात) उभे असलेले तीन पहारेकरी व त्यांच्या सोबत आत उभे असलेले चार ते पाच साथीदार. ह्यांनी प्रत्येक स्टेशनवर चढण्यासाठी उतरण्यासाठी अर्धाच रस्ता ठेवलेला असतो. *त्या जागेतून चढा, वा उतरा नाहीतर मरा*. ह्या मुजोरीला *रेल्वेचा अधिकृत नियम* मानून चढणाऱ्या इतर सामान्य प्रवाशाच्या मनात प्रतिकार करण्याची *शक्तीच* शिल्लक राहिली नाही. त्यामुळे प्रतिकार करणाऱ्या एखाद्या प्रवाशाला मदत करावी हे समजत असूनही, मनात असूनही मदत केली जात नाही. कारण उद्या पुन्हा आपल्याला याच गाडीतून प्रवास करायचा आहे.

अनेक उदाहरणा पैकी एक उदाहरण.. २५ वर्षापूर्वी मुंबईत नव्याने आलेला कॉलेज कुमार ह्याच चौकीदारांच्या मुजोरीचा बळी ठरला. चर्चगेटवरून अंधेरीला उतरायला विरार गाडी पकडली आणि अंधेरीसाठी बांद्राला बसायची जागा सोडली. तिथपासून दरवाज्यापर्यंत येई पर्यंत प्रत्येकांनी त्याला विचारले *कळत नाही का ? विरार गाडी आहे.* तसे त्याने चर्चगेटला विचारले होते. तेव्हा कुणीतरी सांगितले "हो हि गाडी अंधेरीला थांबते." बस्स तो निर्धास्त होता हाच निवांतपणा त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. दारातील चौकीदार उतरायला देत नाही व गाडी तर चालू झाली. त्याने अंगातील सर्व बळ एकवटून जोर लावत उडी मारली. पण वेळ आणि काळ ही एकत्र आला ती उडी रेल्वे रुळावर होती. नंतर डब्यातील इतरांनी जे ह्यात सहभागी होते त्यांनी फक्त ह्या ग्रुपचे नाव पोलिसांना सांगितले. पुढे त्यांचे काय झाले माहित नाही. तो मुलगा माझा कुणीही नव्हता केवळ वर्तमान पत्रातून आलेल्या बातमी आणि अग्रलेखाने मी मात्र बदललो.

मनात तो मुलगा त्याच्या कुटुंबाची भावना आणि ह्या चौकीदारांच्या बद्दल प्रचंड राग घेऊन मी आज ही गेली २५ वर्षे दादर, बांद्रा किंवा अंधेरी वरून विरार जलद गाडी पकडून बोरीवलीला उतरतो. माझा वेळ वाचवा म्हणून नव्हे तर ह्या चौकीदारांना त्याच्या कृत्याची जाणीव करून देण्यासाठी. जेव्हा जेव्हा प्रवास करायचा असतो तेव्हा बोरीवली ते दादर येण्याजाण्याच्या प्रवासात विरार गाडी पकडताना प्रत्येक वेळी गाडी वेगळी, दरवाजा वेगळा असतो. प्रत्येक वेळी वेगवेगळा समूह त्यांचे चौकीदार वेगळे असतात, त्या सर्वांच्या विरोधात प्रवास करताना त्यांना त्यांच्या चुका दाखवत असतो. माझ्या सोबत मुग गिळून चढलेल्या अनेक प्रवाश्यांना पटत असून देखील माझ्या वक्तव्याला, चौकीदारांना मी करत असलेल्या विरोधाला कुणी हि साथ देत नाही. पुढील स्टेशनवर ते चौकीदार उतरून गेल्यावर अनेक जण माझ्या विरोधाचे समर्थन करतात. तेव्हा त्या कौतुकाचे मांस माझ्या शरीराला चिटकु न देता त्यांना मी विचारतो "तेव्हा का नाही माझ्या बाजूने बोललात" एकच उत्तर "कोण त्यांच्या तोंडाला लागेल. उद्या परत हीच गाडी पकडायची असते, त्यांचा ग्रुप असतो." हीच मानसिकता, भिती सामान्य प्रवाशांच्या मनात नव्हे तर रक्तात रुजविण्याचे महान कार्य ह्या दारावरच्या चौकीदारांनी वर्षानुवर्षे इमाने इतबारे केले आहे. एक पैसाही बिदागी न घेतलेल्या प्रत्येक रेल्वेच्या, प्रत्येक दरवाजावरील (स्त्री असो पुरुष / प्रथम असो द्वितीय श्रेणी ) ह्या चौकीदारांच्या समूहाला रेल्वे प्रशासनाने पद्मश्री द्यायला हवी. पण कदाचित ती वेळ आली नसेल कारण अजून मृत्यू हे व्हायचे असतील असे वाटते. ह्या भविष्यात होणाऱ्या मृत्यूची व चौकीदारांची पाठराखण करण्यास कारणीभूत प्रवासी संघटना आहे. कारण त्या पदावर हीच मंडळी किंवा त्यांच्या ओळखीची मंडळी असतील.

मयंक लोहार याच्या मृत्यूने प्रवाश्यांनी रेल्वेच्या अनेक चुका, विलंब, ओव्हर वायर, गाडी रद्द होणे, सिग्नल बंद, पाणी साचणे, गैरसोयी ह्याबद्दल भरभरून आपली बाजू मांडली. ह्या मानव निर्मित व यंत्रणांच्या चुका होतच रहातील किंबहुना त्यावर उपाय हे रेल्वे प्रशासना कडून होतच असतात. इतर वेळी सुरळीत चाललेल्या प्रवासाबद्दल कधी कुणी त्या मोटरमन / गार्डचे कौतुक केले आहे का ? मी एकदा गाडीतून उतरल्यानंतर विचारले होते. कुणी तुम्हांला गाडी नीट वेळेवर म्हणत नाही नीट चालवून आणल्याबद्दल धन्यवाद दिले का ? उत्तर होते कधीतरी एखाद्याने बाकी कुणी हि नाही. हे त्या मोटारमनचे उत्तर. हेच प्रवासी एखादवेळेला झालेल्या त्रासाने फलाटावरील गोष्टीवर,कर्मचाऱ्यांवर, पोलिसांवर आपला सर्व राग व्यक्त करतात.

म्हणूनच रेल्वेतील सुधारणा झाल्या आहेत व होत रहातील आता वेळ आहे प्रवाश्याच्या मानसिकतेवर काम करण्याची. प्रवाशांच्या मनातील समुहप्रणीत चौकीदारांची भीती घालविण्याची. रेल्वे डब्यात होणाऱ्या"प्रवाश्यांनी रांगेतून उतरावे" हि सूचना बंद करण्याची. कारण ह्याचा आपल्या सोयीनी अर्थ घेतलेल्या ह्या चौकीदाराचा प्रवास सुखकर होतो. (ह्या सुखासाठी विरार गाडी सुटल्यावर नालासोपारा दिशेच्या बाजूच्या दरवाजावर कुणी हि उभे नसते. हा अलिखित नियम आहे. का विरारच्या प्रवाशाच्या मनात भीती.) प्रत्येक दारात चौकीदारांच्या मालकीच्या जागेवर पाच प्रवासी हसत खेळत, मोबाईल बघत आरामात रांगेतअसतात आणि दारातून त्यांच्या मागून कसे बसे चढलेले सर्व प्रवासी "ह्या ह्रदयीचे त्या हृदयी"असे एकमेकांना उलटे सुलटे बिलगून श्वास घेत उभे असतात. चौकीदारांच्या त्या पाच साथीदारांकडे व बाजूला चिकटकून घाबरलेल्या दहा प्रवाश्यांकडे दारात २.५ बाय ५ फुट इतकीच जागा असते. हा फरक कुणाच्याच लक्षात येत नाही कुणी तो लक्षात घेत हि नाही. कारण एकच"आपल्याला काय त्याचे ? " पुढे कोण गाडीतून पडून मेला कि करू चर्चा. एक गोष्ट म्हणजे कदाचित इतिहास असेल आज पर्यंत जे काही पडून जखमी वा मृत्यू झाले असतील ते दरवाजात उभे रहाणाऱ्या पाच पैकी पुढील तीन सोडून मागील दोन पैकी एक असणार. कारण पुढील तीन चौकीदार असतात व शेवटचा त्यातल्या त्यात स्वतः ला सांभाळून असतो. त्यामुळे जो पर्यंत ह्या चौकीदारांची व समुहाचा बंदोबस्त होत नाही तो पर्यंत प्रवाशांची मानसिकता हि बदलणार नाही आणि हे मृत्यू होतच रहाणार ... म्हणून ह्यापुढे रेल्वेला जबाबदार न धरता "माझी जागा माझा समूह" हि मानसिकता दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न झाला पाहिजे.

विठ्ठल बाबुराव घाडी

चारकोप, ( लेखक, कवी )

९१६७७५५२०३

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi