रायगड, 22 सप्टेंबर (हिं.स.)। रोहा रेल्वे स्थानकाचे रूपडे पालटण्यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासनाने तब्बल ५५ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून स्थानकाचा चेहरामोहरा बदलून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धर्तीवर विकसित केले जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. सी. डी. देशमुख सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. या विकासकामांची अधिकृत निविदा येत्या आठ दिवसांत काढण्यात येणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे.
या प्रकल्पामुळे रोहा रेल्वे स्थानक विमानतळासारखे आधुनिक दिसणार आहे. नूतनीकरणामध्ये मुख्य टर्मिनल इमारत, अत्याधुनिक प्लॅटफॉर्म, सुसज्ज प्रतीक्षागृह, आधुनिक बुकिंग कार्यालय, व्हीआयपी लाउंज आणि आकर्षक विद्युतीकरणाचा समावेश आहे. याशिवाय दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ, अधिकृत रिक्षा स्टँड, प्रशस्त जोडरस्ते, पादचाऱ्यांसाठी पदपथ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोयीसुविधा पुरवल्या जाणार आहेत. स्थानक परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून भिंतींवर नयनरम्य रंगरंगोटी केली जाईल.
खासदार तटकरे यांनी नमूद केले की, पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून कोकण रेल्वेचे भारतीय मध्य रेल्वेत विलीनीकरण करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यामुळे कोकणातील स्थानकांना मोठा निधी व लांब पल्ल्याच्या गाड्यांना अधिक थांबे मिळतील. तसेच अष्टमी येथील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार असून पडम येथेही पूल प्रस्तावित आहे. पत्रकार परिषदेत प्रस्तावित स्थानकाची चित्रफीत सादर करून रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांना मंजुरी पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी विविध लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

