Dailyhunt
सकलपजवळ बॉक्साईड ट्रेलर उलटला चालक जखमी

सकलपजवळ बॉक्साईड ट्रेलर उलटला चालक जखमी

रायगड, 30 एप्रिल (हिं.स.) : श्रीवर्धन-म्हसळा राज्य मार्गावर सकलपजवळील तीव्र उतारात बॉक्साईड वाहतूक करणाऱ्या बारा चाकी ट्रेलरचा भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलरचा चालक मणिकण (वय 27) गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यातील कारविणे व मेघरे परिसरातून मोठ्या प्रमाणात बॉक्साईड उत्खनन सुरू आहे. या भागातून क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत. दि. 30 एप्रिल रोजी केए-48 ए 2454 क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रेलर बॉक्साईड घेऊन निघाला असताना सकलपजवळील तीव्र उतारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्यावर पलटी झाले, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या अपघातावेळी पुणे येथून हरिहरेश्वरकडे जाणारी पर्यटकांची टाटा सियारा (एमएच-26 बीएच 7121 ई) ही गाडी थोडक्यात बचावली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. उन्हाळी सुट्ट्यांमुळे या मार्गावर पर्यटकांची मोठी वर्दळ असते.

दरम्यान, या मार्गावर यापूर्वीही बॉक्साईड डंपरचे अपघात घडून अनेक जण जखमी झाले असून काहींना प्राण गमवावे लागले आहेत. तरीही महसूल व आरटीओ विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.अपघाताची नोंद म्हसळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi