Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत झाला बंद

सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार तेजीत झाला बंद

वी दिल्ली, 03 जुलै (हिं.स.)। जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आला आणि सलग तिसऱ्या दिवशी बाजाराने वाढीसह व्यवहाराची सांगता केली.

दिवसाची सुरुवात दमदार वाढीसह झाली होती. मात्र, दुपारनंतर गुंतवणूकदारांकडून नफा वसुली सुरू झाल्याने बाजारातील तेजी काहीशी कमी झाली. तरीही दिवसभरातील चढ-उतारानंतर प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले. निफ्टी ५० ९५.१५ अंकांनी (०.३९%) वधारून २४,२७०.८५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स २६1.७९ अंकांनी (०.३४%) वधारून ७७,७६३.९१ अंकांवर बंद झाला.

दिवसभरातील व्यवहारात रिअल्टी, माहिती तंत्रज्ञान आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील समभागांना सर्वाधिक मागणी मिळाली. याशिवाय धातू, पायाभूत सुविधा आणि एफएमसीजी क्षेत्रातील समभागांनीही चांगली कामगिरी केली. दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ऊर्जा आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला. मीडिया, ग्राहक टिकाऊ वस्तू, सार्वजनिक उपक्रम, तेल आणि वायू तसेच कॅपिटल गुड्स क्षेत्रातील समभागही घसरणीसह बंद झाले. व्यापक बाजारात मिश्र चित्र दिसून आले. निफ्टी मिडकॅप निर्देशांकात ०.१९ टक्क्यांची घसरण झाली, तर स्मॉलकॅप निर्देशांकाने ०.०४ टक्क्यांची किरकोळ वाढ नोंदवली.

बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे ९४ हजार कोटी रुपयांची भर पडली. बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य वाढून सुमारे ४८०.२० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील व्यवहाराच्या तुलनेत ही लक्षणीय वाढ असून त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला.

व्यवहारादरम्यान बीएसईवरील ४,२४९ समभागांमध्ये सक्रिय व्यवहार झाले. त्यापैकी २,१८२ समभाग वाढीसह, तर १,८७९ समभाग घसरणीसह बंद झाले. १८८ समभागांमध्ये कोणताही बदल झाला नाही. एनएसईमध्ये २,९९३ समभागांपैकी १,५७७ समभागांनी वाढ नोंदवली, तर १,४१६ समभाग घसरले. सेन्सेक्समधील ३० समभागांपैकी १६ समभाग वाढीसह आणि १४ समभाग घसरणीसह बंद झाले. निफ्टीतील ५० समभागांपैकी ३१ समभागांनी वाढ नोंदवली, तर १९ समभाग घसरले.

दिवसअखेर एचसीएल टेक्नॉलॉजी, मॅक्स हेल्थकेअर, अपोलो हॉस्पिटल्स, बजाज फिनसर्व्ह आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज हे सर्वाधिक वाढ नोंदवणारे समभाग ठरले. तर एक्सिस बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, स्टेट बँक ऑफ इंडिया, लार्सन अँड टुब्रो आणि टेक महिंद्रा यांच्या समभागांमध्ये घसरण झाली. एकूणच जागतिक संकेतांचा सकारात्मक प्रभाव, निवडक क्षेत्रांतील खरेदी आणि गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास यामुळे शेअर बाजाराने सलग तिसऱ्या दिवशीही तेजीची परंपरा कायम ठेवली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi