Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समाजसेवेची दखल; डॉ. अभिजीत सोनावणे यांना 'न्यायमूर्ती रानडे' पुरस्कार

समाजसेवेची दखल; डॉ. अभिजीत सोनावणे यांना 'न्यायमूर्ती रानडे' पुरस्कार

रायगड, 30 एप्रिल (हिं.स.)। समाजातील वंचित, भिक्षेकरी आणि गरजू घटकांना स्वावलंबी बनवण्यासाठी आयुष्य झोकून देणारे डॉ. अभिजीत सोनावणे यांना यंदाचा 'न्यायमूर्ती रानडे' पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

वसंत व्याख्यानमालेत हा सन्मान वक्तृत्त्वोतेजक सभेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे कार्यवाहक डॉ. अविनाश चापेकर तसेच वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या कार्यवाह श्रद्धा परांजपे उपस्थित होत्या. सन्मानपत्र आणि २५ हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

'भिक्षेकरी ते कष्टकरी, कष्टकरी ते गावकरी' हे ध्येय समोर ठेवून डॉ. सोनावणे अनेक वर्षांपासून पुण्यात भिक्षेकरी आणि वंचितांसाठी कार्यरत आहेत. वैद्यकीय उपचार, रोजगारनिर्मिती, गरजूंना संसार उभा करून देणे तसेच वृद्धांची योग्य व्यवस्था लावणे अशा विविध माध्यमांतून त्यांनी अनेकांचे आयुष्य बदलले आहे. त्यांच्या 'खराटा पलटन' या उपक्रमाची विशेष दखल घेतली जात आहे.

आपल्या भाषणात डॉ. सोनावणे यांनी समाजाला आरसा दाखवत ठामपणे सांगितले की, "भिक्षेकरी हा गुन्हेगार नसून परिस्थितीचा बळी आहे. केवळ भिक्षा देऊन समस्या सुटत नाही; त्याला स्वावलंबी बनवणे हीच खरी सेवा आहे." कोविड काळातील अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, समाजाकडून तुच्छतेने पाहिले जाणारे भिक्षेकरीच संकटकाळात रक्तदान करून पुढे आले, ही खरी माणुसकीची जाणीव आहे.

"भिक्षा आणि मदत यामध्ये मूलभूत फरक आहे. भिक्षा माणसाला परावलंबी बनवते, तर मदत त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देते," असे आवाहन करत त्यांनी समाजाच्या मानसिकतेत बदल घडविण्याचे आवाहन केले.

दरम्यान, या पुरस्कारामुळे सामाजिक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना डॉ. सोनावणे यांनी व्यक्त केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi