पुणे, 30 जुलै (हिं.स.)।
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आणि ऐतिहासिक आयोजनासाठी राज्य शासनाकडून मराठी भाषा विभागामार्फत भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.
मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, हे संमेलन जगभरातील मराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन तसेच समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले की, मराठी साहित्य संमेलनाची शंभर वर्षांची परंपरा ही मराठी समाजाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. यापूर्वी नवी दिल्ली आणि सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनांसाठी प्रत्येकी तीन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्याच धर्तीवर आगामी शतक महोत्सवी साहित्य संमेलनासाठीही आवश्यक आर्थिक सहाय्य करण्यात येईल.
तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या सहकार्याने परदेशात होणाऱ्या १२ साहित्य संमेलनांसह युवा साहित्य संमेलन, ९९ वे साहित्य संमेलन आणि मराठी भाषा विभागाच्या विविध उपक्रमांसाठीही निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी साहित्य संमेलनात ग्रामीण साहित्याला अधिक प्राधान्य मिळावे, तसेच मराठीच्या विविध बोलीभाषांचे जतन करण्यासाठी त्यांच्या शब्दकोशांची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही सामंत यांनी व्यक्त केली. मराठी साहित्य संमेलने ही भाषेच्या सन्मानाची आणि सांस्कृतिक जतनाची प्रभावी व्यासपीठे असून, त्यात बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व साहित्यप्रेमींचा सहभाग असावा, असे त्यांनी नमूद केले.
यावर्षीपासून भारतीय आणि जागतिक भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध करून देण्यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने 'अनुवाद समिती' स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र निधी दिला जाणार आहे. तसेच 'अभिजात सप्ताह' निमित्त राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये 'माझी मराठी, अभिजात मराठी' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बळकटीकरणासाठी राज्य मराठी विकास संस्थेमार्फत एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असून, मराठी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी राज्य शासनाचे सहकार्य कायम राहील, असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. तर समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी देश-विदेशातील मराठी संस्थांना एकत्र आणून जागतिक स्तरावर मराठीची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

