लातूर, 30 मे (हिं.स.) : शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाकडून प्राप्त झालेली जादा रक्कम शासनाकडे परत न करता स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्याप्रकरणी निलंगा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी एका मुख्याध्यापकाला दोन वर्षांच्या कारावासाची आणि 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील दोषी मुद्दसिर खलील शेख हे निलंगा येथील गौसुल-उलूम उर्दू प्राथमिक शाळा, शिवाजीनगर येथे सन 2010 ते 2013 या कालावधीत प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते.
तपासादरम्यान असे उघड झाले की, शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांमध्ये शासनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेली जादा रक्कम शिक्षणाधिकारी, लातूर आणि मुख्याध्यापक यांच्या संयुक्त खात्यात जमा करण्यात आली होती. ही रक्कम सुमारे 85 हजार 507 रुपये इतकी होती.
लेखापरीक्षणात आरोपींनी ही रक्कम स्वतःच्या खात्यात वर्ग करून धनादेशाद्वारे काढून घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध निलंगा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम 409 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे चार साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने मुद्दसिर खलील शेख यांना दोषी ठरवत दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील ऍड. व्ही. एम. मेहेजे यांनी मांडली. त्यांना सहाय्यक सरकारी वकील ऍड. ए. एन. अनसरवाडकर यांनी सहकार्य केले.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

