Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिंदी बुद्रूकमध्ये दूषित पाणीपुरवठ्याचा धोका; चार वर्षांपासून 'रेड झोन'मध्ये

शिंदी बुद्रूकमध्ये दूषित पाणीपुरवठ्याचा धोका; चार वर्षांपासून 'रेड झोन'मध्ये

मरावती, ४ ऑगस्ट (हिं.स.) : अमरावती जिल्ह्यातील शिंदी बुद्रूक गावात सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, दूषित पाणीपुरवठ्याच्या धोक्यामुळे गावाला सलग चार वर्षांपासून 'रेड झोन'मध्ये ठेवण्यात आले आहे.

जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडली. त्यानंतर गावकऱ्यांनी समूहाने खासगी बोअरवेल करून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली. सुमारे आठ हजार लोकसंख्या असलेल्या गावात जवळपास ५० बोअरवेल उभारण्यात आल्या. त्यामुळे पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात झाली. मात्र, या बोअरवेलमधील जलवाहिन्या अनेक ठिकाणी नाल्यांमधून टाकण्यात आल्याने गळती झाल्यास दूषित पाणी घरांपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झाला आहे.

याच कारणामुळे प्रशासनाने २०२२ पासून शिंदी बुद्रूक गावाचा 'रेड झोन'मध्ये समावेश केला आहे. त्यामुळे भविष्यात साथरोगांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलजीवन मिशन अंतर्गत ८३ गावांच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये शिंदी बुद्रूकचा समावेश करण्यात आला आहे. गावात पाण्याची टाकी उभारण्यात आली असली तरी जलवाहिनीचे काम अद्याप अपूर्ण आहे. ग्रामपंचायतीने याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. मात्र, वाढीव निधी मंजूर झाल्यानंतरच उर्वरित जलवाहिनीचे काम पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्यात येईल, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, संभाव्य आरोग्यधोका लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने नाल्यांमधून गेलेल्या जलवाहिन्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील चार वर्षांपासून गावाला 'रेड झोन'चे कार्ड मिळत आहे, ही अत्यंत चिंतेची बाब असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीची उपाययोजना हाती घेण्यात येत आहे, अशी माहिती ग्रामपंचायत अधिकारी वैशाली बोरोडे-वाठ यांनी दिली.

-----------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Samachar Marathi